सांडवे येथे महिलांसाठी कृषी विषयक मार्गदर्शन शिबीर 

शिरगाव (प्रतिनिधी)      देवगड तालुक्यातील सांडवे, मांजरेकरवाडी येथे कृषि विभागाच्या वतीने महिलांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. या उपक्रमात महिलांना आधुनिक शेतीतंत्र, महाविस्तार ॲपचा वापर, कृषी समृद्धी योजना आणि ॲग्री स्टॅक फार्मर आयडी काढण्याबाबत सखोल माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात महाविस्तार ॲपद्वारे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती मिळण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच महिलांना बाजारपेठेतील बाजारभाव आणि संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिलांनी शेतीतील नवकल्पना स्वीकारण्याची तयारी दर्शविली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कृषी समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त अर्ज करून लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्रीमती आरती पाटील यांनी केले.

यावेळी महिलांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला आणि उपस्थित महिलांनी आपले अनुभव कथन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांना माहितीपत्रक आणि ॲप वापरण्याचे प्रशिक्षण दिले गेले. उपस्थित महिलांनी हा उपक्रम प्रेरणादायक ठरल्याचे व्यक्त केले.

यावेळी ग्रामपंचायत सांडवे सरपंच श्री सुहास परब, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश मांजरेकर, तालुका कृषी अधिकारी श्रीम. आरती पाटील, सी आर पी श्रीमती प्रिया परब, सहाय्यक कृषी अधिकारी श्री अमोल इढोळे, इतर महिला भगिनी आणि शेतकरी वर्ग मोठ्या सख्येने उपस्थित होता.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहाय्य कृषी अधिकारी अमोल इढोळे यांनी केले