गाडी चालकाची पोलिसांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी : गुन्हा दाखल
वेंगुर्ले : प्रतिनिधी
आडेली येथील साईप्रसाद उर्फ गोठ्या विजय नाईक वय ३२ याने आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची ईर्टीगा गाडी नंबर एम एच ०७ ए एस ९७९६ ही गाडी दारूच्या नशेत भरधाव वेगात चालवून वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावरील मठ हायस्कूलच्या गेटच्या भिंतीला धडकवून बुधवारी रात्री उशिरा अपघात केला. गाडीचे व गेटचे मोठे नुकसान झाले सुदैवाने चालक बचावला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेले पोलीस निरीक्षक व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना सदर गाडी चालकाने शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्याच्यावर वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस स्वप्निल रामचंद्र तांबे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आडेली येथील साईप्रसाद हा इर्टिगा गाडी घेऊन वेंगुर्ले वरून सावंतवाडीच्या दिशेने जात असताना मठ येथील हायस्कूलच्या गेटच्या भिंतीला गाडीची धडक बसुन अपघात झाला. अपघातामध्ये गाडीचे आणि गेटचे नुकसान झाले. सुदैवाने चालक नाईक बचावला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता चालकाने उलट पोलिसांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अपघात केल्याप्रकरणी व पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रमाणे चालका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत.












