६ लाखांचा मुद्देमाल जप्त : दोघांना अटक
सावंतवाडी : गोवा बनावटीची दारू घेऊन कोल्हापूरच्या दिशेने पळून जाणाऱ्या एका इनोव्हा कारचा फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून चौकुळ रस्त्यावर पकडले. या कारवाईत एकूण ₹६,०२,०००/- (सहा लाख दोन हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १३.१०.२०२५ रोजी रात्री अंदाजे ९.३० वाजता आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे पोलीस कर्मचारी वाहनांची तपासणी करत होते. यावेळी सावंतवाडीकडून कोल्हापूरच्या दिशेने इनोव्हा (गाडी क्रमांक MH 02 BD 2917) ही गाडी आली. पोलिसांनी तिला थांबवण्याचा इशारा करताच, चालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगाने पळ काढला.
पोलीस पथकाने तात्काळ सरकारी वाहनाने या इनोव्हाचा पाठलाग सुरू केला. हा पाठलाग चौकुळ रस्त्यापर्यंत सुरू होता. पळून जाणाऱ्या वाहनाला रोखण्यासाठी पोलिसांनी चतुराईने चौकुळ येथील स्थानिक लोकांना रस्ता ब्लॉक करण्याची सूचना दिली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने व पोलिसांच्या पाठलागामुळे सदर इनोव्हा गाडी अखेर थांबवण्यात पोलिसांना यश आले.
गाडीची तपासणी केली असता, त्यात गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूचे एकूण २० बॉक्स आढळून आले. या दारूची किंमत ₹१,०२,०००/- (एक लाख दोन हजार रुपये) इतकी आहे. अवैध दारूसह ५ लाख रुपये किमतीचे इनोव्हा वाहन असा एकूण ₹६,०२,०००/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी वाहनचालक सतीश भीमराव आर्दळकर (वय ३७, रा. अडकूर, चंदगड, कोल्हापूर) व अविनाश दशरथ पाटील (वय ३२ वर्षे, रा. बोंदुर्डी, चंदगड, कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा नोंद करून अटकेची कारवाई करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली
सदरची यशस्वी कारवाई सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात हवालदार संतोष गलोले, रामदास जाधव, लक्ष्मण काळे, मनीष शिंदे आणि गौरव परब यांचा समावेश होता. अवैध दारू तस्करीवर सावंतवाडी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.










