कर्जत येथे तीन दिवसीय महिला मेळावा संपन्न;222 महिलांचा सहभाग

दापोली प्रतिनिधी: आजच्या शेतीमधील यांत्रिकीकरण गरजेचे आहे. विविध कामांसाठी लागणाऱ्या छोट्या यंत्रांच्या वापरामुळे भविष्यात शेतीमधील कामे सोपी होणार आहेत. शेतीतील विविध कामे प्रामुख्याने महिला करतात. त्यामुळे विकसित भारतासाठी शेतीच्या यांत्रिकीकरणामधून महिला मोठे योगदान देऊ शकतात. आत्ताच्या महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन काम करीत आहेत. शेतीमधील यांत्रिकीकरणाचा विकास कसा करावा याचे या प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपल्या कडिल शेतीचे क्षेत्र कमी आहे. या कमी क्षेत्रामध्ये मोठी अवजारे चालत नाही याकरीता बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने छोटी छोटी अवजारे विकसीत केली आहेत. याआधारे शेतीतील श्रम कमी करता येईल. सध्या ड्रोन नावाच्या उपकरणांव्दारे शेतीतील विविध कामे केली जातात. प्रत्येक यंत्रसामुग्री विकसित करताना प्रत्येकाचे कार्य हे वेगवेगळे आहे. प्रत्येक यंत्र हे उद्दिष्ट ठेवून विकसित केले गेले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या अवजारांचे परिपूर्ण प्रशिक्षण घेऊन मूल्यवर्धन करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून अशा यंत्राचा फायदा घेतला गेला पाहिजे. वेगवेगळे यंत्रे कशी चांगल्या प्रकारे हाताळावीत,शेतीतील पर्याय नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहेत याचेच प्रशिक्षण दिले जात आहे. देशाला टिकवायचे असेल तर शेती करणे आवश्यक आहे असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. मकरंद जोशी यांनी व्यक्त केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, भारत सरकारच्या शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्था, बुदनी (मध्य प्रदेश) आणि कृषि यंत्राची चाचणी आणि निरीक्षणे, कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत (जि. रायगड) येथे महिलांसाठी तीन दिवसीय सुधारित महिलांसाठी उपयुक्त शेती अवजारे/यंत्राचा वापर व देखभाल प्रशिक्षण व प्रात्यक्षिके प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणाला कर्जत तालुक्यातील 222 महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.


डॉ. वाघमोडे म्हणाले, केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्था, बुदनी आणि कृषि यंत्राची चाचणी आणि निरीक्षणे, कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी
प्रादेशिक संशोधन केंद्र येथे महिलांकरीता अवजारांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षणाचा जो कार्यक्रम घेतला आहे तो स्तुत्य आहे. शेती कामांमध्ये महिलांचा सहभाग अधिक आहे मशिनरी हा पर्याय आता भविष्यात महत्त्वाचा ठरणार आहे

प्रकल्पाचे प्रमुख डॉ. धांदे यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलतांना म्हटले की, सुधारित कृषी अवजारे आणि यंत्रे वापरून महिला शेतकऱ्यांचे शेतीतील श्रम कमी करणे हे या प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.आधुनिक तंत्रज्ञानामुळे कामाची गती वाढते आणि वेळेची बचत होते. या प्रशिक्षणांमुळे महिला शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळते आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते.

महिलांनी आपली कार्यक्षमता कशी वाढवावी, नवनवीन तंत्रज्ञानाने विकसीत यंत्राचा वापर करुन कमी वेळात कामे करता येईल यासाठी मोठ्या अवजारांचा वापर करावा लागतो असे नाही, तर लहान लहान अवजारांचा वापर करुन देखील आपण शाश्वत शेती करु शकतो. या प्रशिक्षण वर्ग हा खासकरून महिलांसाठी आहे. शेतीमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. शेतीमध्ये महिलांसाठी या विद्यापीठाने सुलभ आणि छोटी छोटी अवजारे विकसित केली आहे तर अजुनही नवनवीन अवजारे विकसीत होत आहेत. या नवीन तंत्रज्ञानाचा आधारे कमी खर्चात शाश्वत शेती होऊ शकते. नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे याचा वापर करुन मनुष्यबळही कमी लागते.

डी.एस.वरप्रसाद यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. या योजनेमुळे गावातील महिलांना गावातच रोजगार उपलब्ध होईल. या वेळी त्यांनी महिलांच्या बचत गटांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या कृषी अवजारे व यंत्रे यासंबंधीच्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी मंत्रालयाच्या संयुक्त सचिव श्रीमती एस रुक्मिणी यांचे या प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठी यावेळी विविध कृषी अवजारे व यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

या प्रशिक्षणाकरीता सहयोगी संशोधन संचालक डॉ. वाघमोडे, प्रकल्पाचे प्रमुख डॉ. किशोर धांदे, डॉ. सचिन पाठक, डॉ. निलेश शिरसाट, केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्था, बुदनीचे तांत्रिक अधिकारी डी.एस.वरप्रसाद, विजय बडोदे, महेश भागडकर आदी अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व इतर प्रशिक्षणाची माहिती डॉ. सचिन पाठक यांनी दिली व आभार प्रदर्शन डॉ. निलेश शिरसाट यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिप तांबे, श्री. सतकर- कृषि सहायक, श्री. शिगवण, श्री.दरोडे, नागेश ढाकोरे, राकेश नलगे, संदेश मुलुख यांनी परिश्रम घेतले.