शातादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे येथे ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र वाटप

चक्क आईच्या हस्ते मुलाला मिळाला दाखला

दोडामार्ग: श्री शातादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे येथे राज्य सरकारच्या ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी या उद्देशाने नुकतेच वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गावातच ही महत्त्वाची प्रमाणपत्रे उपलब्ध झाली.

या कार्यक्रमादरम्यान एक अनोखा योगायोग जुळून आला. शिक्षक पालक संघाच्या सदस्या सौ. समीक्षा संतोष गवस यांच्या मुलाचे नाव दाखला घेण्यासाठी पुकारले गेले, तेव्हा सूत्रसंचालन करणाऱ्या शिक्षिकेने नाव उच्चारताच उपस्थितांना कळाले की, मुलांची आई असलेल्या सौ. समीक्षा गवस यांच्याच हस्ते मुलाला वय, अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला वितरण करण्यात आला.

तसेच, दुसरा एक विशेष योग म्हणजे, या कार्यक्रमासाठी दोडामार्ग तालुका तहसील प्रतिनिधी व साटेली भेडशी मंडळ अधिकारी कांचन गवस या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्या याच प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांनी पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत घेतले होते. शिकलेल्या शाळेत अधिकारी म्हणून उपस्थित राहून दाखले वाटप करण्याचा योग त्यांना लाभला.

यावेळी पिकुळे शाळा समिती सदस्य तथा झरेबांबरचे सरपंच अनिल शेटकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सदस्य सौ. समीक्षा गवस यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक अशोक आंबुलकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

याप्रसंगी बोलताना मंडळ अधिकारी कांचन गवस यांनी, “मी शिकलेल्या शाळेत दाखले वाटप करण्याचे भाग्य लाभले आहे. राज्य सरकारच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करत असताना ग्रामीण भागातील मुलांची सोय झाली आहे,” असे समाधान व्यक्त केले. तसेच, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अनिल शेटकर यांनी मार्गदर्शन करताना, शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून महसूल विभागाने यापुढेही असे अनेक उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी तहसीलदार कार्यालय व शाळेचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला सहा. शिक्षिका पूर्वा गवस, प्रियंका गवस, गोविंद गावडे, प्रवीण राठोड, वेदा मणेरीकर, सुहास देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा गवस यांनी केले. तहसीलदार कार्यालय आणि शाळेच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.