पुरोगामी शिक्षक संघटनेची शासनाकडे मागणी
*राज्यातील इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा या शैक्षणिक वर्षात घेणे बाबतचा शासन निर्णय पहिले सत्र संपल्यानंतर जाहीर होणे ही बाब संयुक्तिक नसल्याने विद्यार्थी हितासाठी दि. १७ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षात न करता पुढील शैक्षणिक वर्षात (सन २०२६ – २७) पासून करावी अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.*
निवेदनाच्या प्रती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण राज्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण संचालक व माध्यमिक शिक्षण संचालक यांनी मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.
शासनास दिलेल्या निवेदनात राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षा ही महत्वाची परीक्षा असल्याने या परीक्षेची तयारी विद्यार्थी, शिक्षक व पालक वार्षिक परीक्षा संपताच म्हणजे एप्रिल पासूनच करीत असतात.
आतापर्यंत इयत्ता ४ थी व ७ वी वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शासनाची अधिकृत घोषणा नसल्याने नेहमी प्रमाणे या वर्षी फक्त इयत्ता ५ वी व ८ वीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा तयारी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी केली आहे.
परीक्षेच्या फक्त ६ महिने अगोदर इयत्ता ४ थी- ७ वी वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये व इयत्ता ५ वी- ८ वी या वर्गांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२६ मध्ये घेणे आणि २०२६ – २७ या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता ४ थी- ७ वी वर्गाची परीक्षा घेणे बाबतचा निर्णय जाहीर करणे हा चालू शैक्षणिक वर्षातील इयत्ता ४ थी व ७ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यावर अन्यायकारक कारक आहे.
===================
*शासनाचा निर्णय स्वागतार्ह पण यावर्षी खूप उशीर झाला..* शिष्यवृत्ती सारख्या महत्वाच्या परीक्षेबाबाताचा निर्णय किमान एप्रिल मध्ये जाहीर होणे आवश्यक होता. शिक्षक पहिल्या सत्रात अभ्यासक्रम पूर्ण करुन दुसऱ्या सत्रात सराव प्रश्न पत्रिका सोडवून घेत असतात. या वर्षी इथूनपुढे फक्त ६ महिन्यात इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेची चांगली तयारी होणे अशक्य असल्याने सदर परीक्षा पुढील शैक्षणिक वर्षात होणे संयुक्तिक होईल.
*प्रसाद पाटील-*
राज्याध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना.
===========












