न. प. प्रशासनाने पकडलेली गुरे एक महिना उलटला तरी कोंडवाडयातच
राजापूर (प्रतिनिधी): एकीकडे मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून प्रशासनाकडून यावर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे मात्र या मोकाट गुरांच्या बाबत त्यांचे मालकच किती बेफिकिर आहेत याची प्रचिती राजापूर नगर परिषदेला आली आहे. नगर परिषद प्रशासनाने शहरात फिरणाऱ्या सहा मोकाट गुरांना पकडून कोंडवाडयात ठेवून तब्बल एक महिन्याचा कालावधी उलटला तरी या गुरांचे मालक त्यांचा ताबा घेण्यासाठी न फिरकल्याने त्यांच्यावर दैनंदिन चारापाण्यासाठी होणारा खर्च भागविताना न. प. प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे रोग परवडला पण ईलाज नको अशीच काहीशी अवस्था राजापूर न. प. प्रशासनाची झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
राजापूर शहरासह मुंबई गोवा महामार्ग, सागरी महामार्ग व अन्य ग्रामिण भागातील राज्य व जिल्हा मार्ग या ठिकाणी दिवसा व रात्री अगदी झुंडीने मोकाट गुरे फिरत आहेत. यामुळे अनेक वेळा गंभीर अपघातही झाले आहेत. तर अपघातांचा धोका अद्यापही कायम आहे. या विरोधात आंदोलनही झाले, तर आमदार किरण सामंत यांनी प्रशासनाला यावर ठोस उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले. त्याप्रमाणे प्रशासनाने नगर परिषदेसह महामार्गालगत असलेल्या ग्रामपंचायतींना पत्र देऊन यावर उपाययोजना कराव्यात असे आदेश दिले.
राजापूर शहरातील मोकाट गुरांच्या उपद्रवाबाबत न. प. प्रशासनानेही तात्काळ उपाययोजना हाती घेतली. प्रारंभी मालकांनी मोकाट गुरे सोडू नयेत कारवाई केली जाईल अशी नोटीस प्रसिध्द केली. मात्र तरीही मोकाट गुरांचा उपद्रव कमी न झाल्याने अखेर मोकाट गुरांची पकड मोहिम न. प. प्रशासनाने राबविली व यात सहा मोकाट गुरे न. प. प्रशासनाच्या आरोग्य विभागाने पकडली व कोंडवाडयात ठेवली. यानंतर या विभागाच्या वतीने जाहिर नोटीस प्रसिध्द करून पडकडण्यात आलेली ही मोकाट गुरे ज्यांची आहेत त्या मालकांनी योग्य ओळख पटवून घेऊन जावीत असेही आवाहन करण्यात आले. मात्र तब्बल एक महिना उलटला तरी कुणीही मालक या गुरांसाठी न. प. प्रशासनाकडे आलेला नाही. कुणीही मालक न आल्याने अखेर न. प. प्रशासनाने या गुरांच्या लिलावाचीही नोटीस प्रसिध्द केली. मात्र त्यालाही प्रतिसाद मिळालेला नाही.
गुरे पकडून व आवाहन करून तब्बल एक महिन्याचा कालावधी उलटला तरी कुणीही मालकांनी यासाठी न. प. प्रशासनाकडे संपर्क न साधल्याने या गुरांबाबत खुद्द मालकच बेजबाबदार असल्याची बाब पुढे आली आहे. मात्र या गुरांना कोंडवाडयात सांभाळताना त्यांना दैनंदिन चारा पाणी देताना व त्याचा खर्च करताना न. प. प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे.











