निगुडेत भरवस्तीत धाडसी चोरीने खळबळ ; पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास

 

बांदा |  प्रतिनिधी :निगुडे – पाटीलवाडी येथे मंगळवारी दुपारी सिराउद्दीन इब्राहिम हेरेकर यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. ६ तोळे सोन्यासह २ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बांदा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून चोरट्यांचा तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिराउद्दीन हेरेकर हे दुपारी १२ वाजता आपल्या मुलीला सावंतवाडी येथे डॉक्टरकडे घेऊन गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी भरवस्ती मधील घरात चोरी केली. घराच्या मुख्य दरवाजचे कुलूप तोडून खोलीतील कपाटाच्या लॉकर मधील ५९ ग्रॅम सोने, चांदी व रोकड असा एकूण ४ लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज लुटला.

बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. श्वान पथक व ठसेतज्ञही घटनास्थळी दाखल झाले होते. दोन दुचाकीवरून काही तरुण आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. शेती परिसरातून चिखलातून चोरटे दुचाकी घेऊन पसार झाल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी संताप व्यक्त केला. खामदेव चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्यात अडचणी येणार आहेत. चोरटे स्थानिक माहितगार असण्याचीही शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.