पेडणे पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल
पेडणे (प्रतिनिधी) :
पेडणे तालुक्यातील पोरस्कडे उगवेच्या सीमेवर तेरेखोल नदीकिनारी वाळू व्यवसायाशी संबंधित असलेल्या दोघा कामगारांवर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. रामरिशी रामराज पासवान आणि लाल बहादूर गोड अशी त्यांची नावे आहेत. दोघेही कामगार गंभीर जखमी असून त्यांच्यावर बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेने पेडणे परिसर हादरून गेला आहे. पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उगवे – पोरसकडे येथील काही रेती व्यवसायाशी संबंधित असलेला एक गट रेती काढण्यासाठी आठ जण होडीत बसले होते. रेती काढण्यासाठी जात असतानाच या दोन कामगारावर गोळी झाडण्यात आली. या धक्कादायक घटनेत एका कामगाराच्या मानेतून गोळी आरपार गेली आहे. तर दुसऱ्या कामगाराच्या हातातून गोळी आरपार झाली.
गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली, ही घटना नेमकी कशी घडली? याचा शोध पोलीस सुरू केला आहे. घटनास्थळी पुराव्याची पडताळणी करण्यात आली असून नक्की गोळीबार कशासाठी झाला आणि कोणी केला हे अजून स्पष्ट झालेले नही.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेसुमार वाळू उत्खन करण्यावर बंदी घातली आहे. मात्र परप्रांतीय मजुरांचा आधार घेऊन राज्यातील सरकारी मालमत्तेवर डल्ला मारला जातो. काही ठिकाणी बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांशी प्रशासनाची मिलीभगत असल्याचा आरोप केला जातो. चोरट्या पद्धतीने होणारा हा वाळू उपसा रोखण्यासाठी फिरती पथके स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्या त्या तालुक्यातील उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस निरीक्षक तसेच स्थानिक तलाठ्यांना कारवाईचे अधिकार बहाल करण्यात आले. मात्र अशा कारवाई करण्याऐवजी दुर्लक्ष केले जाते. त्यातूनच या व्यवसायातून वर्चस्ववादाची स्पर्धा घातक वळणावर पोचली आहे.








