“मोंथा चक्रीवादळाच्या तडाख्यात 34 खलाशासहित भरकटल्या होत्या 4 मच्छिमार नौका
मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नाम.नितेश राणे यांनी दिले विशेष लक्ष
गुहागर प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर “मोंथा” नावाच्या वादळाने घातलेल्या थैमानमध्ये करंजा तालुक्यातील २, गुहागर व दापोली तालुक्यातील २ अशा चार मच्छिमार नौका दिनांक 26 ऑक्टोबर पासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर होत्या. या संदर्भात महाराष्ट्र खलाशी संघटनेचे अध्यक्ष विकास दाभोळकर यांनी संपर्क केल्यानंतर उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपाचे सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी रत्नागिरी भाजप माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि रायगड भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे कार्य तत्पर आणि कर्तव्यदक्ष बंदर विकास व मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांच्याकडे संपर्क केला हा संपर्क झाल्यानंतर मंत्री महोदयांनी या विभागाशी संबंधित असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावून या नौकांचा पत्ता लावला आणि वर्सोवा नजीकच्या खोलवर समुद्रात भरकटलेल्या या 4 बोटी शुक्रवार दिनांक 31 रोजी रात्री बरोबर 9 वाजून 30 मिनिटांनी करंजा जेटीवरती दाखल झाल्या.
करंजा तालुक्यातील सचिन रघुनाथ पाटील यांच्या मालकीची चंद्राई,सत्यवान रघुनाथ पाटील यांच्या मालकीची श्री गावदेवी बोट या बोटीसहित गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील व दापोली तालुक्यातील कोलथरे येथील एक बोट अशा भरकटलेल्या चार बोटींवरती एकूण 34 खलाशी काम करत होते. यामध्ये प्रामुख्याने गुहागर तालुक्यातील खलाशांची संख्या अधिक होती 26 तारखेपासून मोंथा वादळात भरकटलेल्या बोटींची माहिती खलाशी संघटनेचे अध्यक्ष विकास दाभोळकर यांना लागल्यानंतर त्यांनी तात्काळ या बोटीच्या संपर्कासाठी प्रयत्न सुरू केले आणि या प्रयत्नांना सन्मा.मंत्री नितेशजी राणे यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.त्यांच्या प्रयत्नांमुळे सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागून या बोटींशी संपर्क झाला.देवकृपेने आणि मंत्री महोदय नितेश राणे साहेब,रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदारजी साठे,रायगड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष अविनाश कोळी आणि रत्नागिरी जिल्हा भाजपा सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी एकत्रितरित्या प्रयत्न केल्यामुळे आज आमचे सर्व खलाशी व बोटी सुखरूप किना-यावर आल्याची भावना विकास दाभोळकर यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर कोकणाशी नाळ जोडलेले आणि या व्यवसायाची माहिती असलेले व्यक्तिमत्व आज मंत्रिपदावर असल्यामुळे माझ्या गुहागर तालुक्यातील व इतर मच्छीमार बांधवांच्या कुटुंबीयांना आज मोठा दिलासा मिळाला असल्याचे मत निलेश सुर्वे यांनी व्यक्त केले आहे. माझ्या सर्व खलाशी बांधव व बोटी किनाऱ्यावर सुखरूप येण्यासाठी,यांच्या जवळ संपर्क होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांबद्दल विकास दाभोळकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.













