गावागावात जाऊन जनतेला दिल्या शासकीय सेवांचा लाभ

खेड (प्रतिनिधी): भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) महाराष्ट्र युवक अध्यक्ष किरण संजय तायडे यांच्या पुढाकारातून दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी खेड खाडी पट्टा विभागात विविध शासकीय सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यात आल्या. या उपक्रमात श्री. किरण संजय तायडे आणि श्री. राजेश बुदर यांच्या माध्यमातून सवनस, सडे, तळघर, अनासपुरे, दमामे, कोंडये आणि सांगलट या गावांतील नागरिकांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरांमधून नागरिकांना आधार अपडेट्स, ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी KYC, पॅन कार्ड, विविध शासकीय दाखले, ई-श्रम नोंदणी तसेच अपंग नोंदणी अशा आवश्यक सेवांचा लाभ मिळाला. गावात प्रत्यक्ष जाऊन सेवा पुरविण्याच्या या उपक्रमामुळे विशेषतः अपंग, आजारी आणि वृद्ध नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेकांनी आपल्या विविध कामांचा निपटारा एका ठिकाणी करून घेतला. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरली. या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी किरण तायडे आणि राजेश बुदर यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले.