खेड (प्रतिनिधी) :
गेली वीस वर्षे एका पक्षासाठी निष्ठेने काम करत, तीन वेळा नगरपालिका सत्तेत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे वैभव खेडेकर यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला hota. संकटकाळात नागरिकांसोबत खंबीरपणे उभे राहणाऱ्या आणि जमिनीवरुन नेतृत्व घडवणाऱ्या खेडेकरांच्या कामाची दखल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली. त्यांच्या उपस्थितीत वैभव खेडेकर यांच्या सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा बुधवार पाच नोव्हेंबर रोजी खेड शहरातील स्व मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात पार पडला.
माझ्या पक्षप्रवेशाला अडथळा आणण्यासाठी काहींनी पद्धतशीरपणे प्रयत्न केले, असे सूचक वक्तव्य करीत खेडेकर म्हणाले की, “माझा भाजपमध्ये प्रवेश होऊ नये म्हणून काहींनी देवसुद्धा पाण्यात बुडवले. पण कोकणातील देवता आणि भाजपचे शीर्ष नेतृत्व माझ्यासोबत होते. जिल्ह्यातील दोन्ही आमदार, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळेच हा पक्षप्रवेश शक्य झाला.”



खेडेकर यांनी यावेळी दापोली विधानसभा आणि खेड नगरपालिकेच्या राजकीय चित्रात बदल घडवण्याचे संकेत स्पष्ट शब्दांत दिले. “दापोली विधानसभेपासून ते खेड नगरपरिषदेसह जिल्ह्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला दिसेल. यासाठी मी आणि माझी टीम पूर्ण ताकदीने काम करणार आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोकणातील विकासाबाबत बोलताना त्यांनी रस्ता, पाणी आणि रोजगार या मूलभूत मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगितले. “गेल्या दहा वर्षात कोट्यवधींचा निधी दापोली भागात आला. परंतु त्याचे श्रेय मात्र इतरांनी घेतले. पुढे असे होणार नाही. गावोगावी विकासनिधी पोचवण्यासाठी चव्हाण साहेबांची उपस्थिती हे आमच्या विश्वासाचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले.
“खेड नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा बहुमताने फडकवण्यासाठी आपण पुन्हा खेडमध्ये यायचं आहे. हा झेंडा आपल्या हाताने फिरवू, अशा ताकदीने आम्ही पुढील लढाई लढणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.











