स्थानिकांमध्ये घबराट
बांदा l प्रतिनिधी :डोंगरपाल येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून काल मध्यरात्रीच्या सुमारास येथील मिलिंद परब यांच्या फार्म हाऊस मध्ये बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या फार्म हाऊस मध्ये दोन कामगार वास्तव्यास असून बिबट्याच्या अस्तित्वामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी समस्त डोंगरपालवासी यांच्या वतीने मिलिंद परब यांनी केली आहे.
डोंगरपाल येथे वारंवार बिबट्या स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास येत आहे. गेल्या वर्षीही याच फार्म हाऊस मध्ये बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला होता. त्यावेळी मिलिंद परब यांनी सदर बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली होती. मात्र वनविभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
मिलिंद परब हे नोकरीनिमित्त परदेशात असतात. त्यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी आपल्या शेती क्षेत्रात फार्म हाऊस बांधून त्या ठिकाणी दोन कामगार नियुक्त केले आहेत . बिबट्याच्या अस्तित्वामुळे ते कामगार काम करण्यास घाबरत आहेत. सदर बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी मिलिंद परब यांनी केली आहे.













