आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग

नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय चढाओढ, उमेदवार निवडीकडे लक्ष

संतोष कोत्रे
लांजा -: नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना वेग येणार आहे. लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसहित १७ नगरसेवक पदासाठी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केलेले नसले तरी १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असल्याने पुढील दोन ते तीन दिवसात उमेदवार निश्चिती होऊन राजकीय धुळवडीला सुरुवात होईल, असे असले तरी या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांची युती होणार की स्वबळावर लढणार ? याचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तर दुसरीकडे राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा -शिवसेना युतीला लढत देण्याच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील दोन ते तीन दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक चुरस असेल ती लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी. या पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून पाच ते सहा जण इच्छुक आहेत. तर भाजपा पक्षाने देखील नगराध्यक्ष पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. दोन्ही पक्षांकडून नगराध्यक्ष पदावर दावा केला जात आहे.‌ त्यामुळे युती होणार की फिस्कटणार हे देखील पुढील काळात दिसून येणार आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचाय निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारपासून जाहीर झाली आहे. लांजा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांची संख्या ही १७ आहे. यावेळी नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित आहे. याबरोबरच १७ नगरसेवकांपैकी ९ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे यावेळी नगरपंचायतीवर महिलाराज येणार आहे. असे असले तरी निवडणूक जाहीर झाल्यानंतर नगरसेवक पदासाठी प्रत्येक प्रभागातून पाच ते सहा जण इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला तिकीट मिळणार व कोणाचा पत्ता कट होणार? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
लोकनियुक्त असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी यावेळी मोठी चुरस पहावयास मिळत आहे. सद्यस्थितीत लांजा शहरासह तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद आहे. मोठ्या प्रमाणावर झालेले पक्षप्रवेश पाहता शिवसेना शिंदे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडूनच पाच ते सहा जण इच्छुक आहेत. त्यातील काही जणांनी तर नगराध्यक्ष पदावर डोळा ठेवूनच पक्षात प्रवेश केला होता. तर काही काहीजण आपल्यालाच उमेदवारी मिळणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या या भाऊगर्दीतून आमदार किरण सामंत हे नगराध्यक्ष पदासाठी कोणाला संधी देतात किंवा नवीन चेहऱ्याला संधी देणार? हे आगामी काळात दिसू येणार आहे.तर दुसरीकडे मित्र पक्ष असलेला भाजपाकडूनही नगराध्यक्ष पदासाठी मोर्चे बांधणी केली आहे. नगराध्यक्ष पद आपल्याच पारड्यात पडावे या दृष्टीने भाजपा पक्षाकडून देखील वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे हे नगराध्यक्ष पदावरून युती फिस्कटणार की तडजोड होणार? हे आगामी काळात दिसून येणार आहे.
तर दुसरीकडे विरोधक असलेल्या शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी चुरस नसली तरी देखील अद्यापही त्यांच्याकडून नगराध्यक्षपदा बाबत किंवा नगरसेवकाचे तिकीट कोणाला द्यायचे याबाबत ठोस निर्णय झालेला नाही.
नगराध्यक्ष पदा बरोबरच नगरसेवक पदासाठी देखील जोरदार चुरस पहावयास मिळत आहे. अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने १७ प्रभागातून आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. केवळ इच्छुकांची नावे समोर येत आहेत. या इच्छुकांच्या भल्यामोठ्या यादीतुन कोणाची निवड होणार? आणि कोण निवडणुकीला सामोरे जाणार? याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.