रत्नागिरीत ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचा शानदार शुभारंभ!

गुहागरच्या दर्यावर्दी प्रतिष्ठानचे ‘अकल्पित’ सादर 

रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात दिनांक १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाली आहे. या स्पर्धेमुळे रत्नागिरीच्या नाट्य रसिकांना तब्बल एक महिना नाटकांची मेजवानी मिळणार आहे.
​दिनांक १० नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२५ या दरम्यान, रोज सायंकाळी ७ वाजता नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडणार असून, याबाबतची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक श्री.विभीषण चवरे यांनी नमूद केली आहे.
​उद्घाटन समारंभ दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता पार पडला. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्यवाह श्री. वामन कदम, ज्येष्ठ रंगकर्मी श्री. दत्ता बोरकर आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य श्री. राजेश गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
​या स्पर्धेत एकूण १८ संघांचा सहभाग असून, उद्घाटनानंतर दर्यावर्दी प्रतिष्ठान निर्मित ‘अकल्पित’ या नाटकाने स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी श्री. विजय शिंगणे (नाशिक), प्रा. डॉ. सौ. संगीता टेकाडे (नागपूर) आणि श्री. सुनील जगताप (वाशिंद) हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी नाट्यप्रेमींना आवाहन केले आहे की, त्यांनी राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त उपस्थित राहून हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा.