मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे संस्थाधिपाल,मराठी ग्रंथालय चळवळीचेअध्वर्यु व कादंबरीकार आचरे गावचे-अच्युत तारी

सिंधुदुर्गचे माणिकमोती …(२१८)

डाॕ.बाळकृष्ण लळीत.

 

 

—————————————

अच्युत रामचंद्र तारी यांना मी १९८५-८६ दरम्यान मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात प्रथम भेटलो. तेथील मनोहर पारायणे व लतिका जोशी या मान्यवरांची ‘मालवणी संदर्भा’च्या विषयी मला भेट घ्यायची होती. तेव्हा समजले एवढया महत्त्वाच्या संस्थेचा कार्यभार अच्युत तारी हे उत्तम प्रकारे चालवतात,ते आपल्या आचरे गावचे म्हणजे मालवणी मुलखातील आहेत. याचा अभिमान वाटला.त्यांनी काही कादंबऱ्या लिहिलेल्या होत्या आणि चंद्रकांत खोत यांच्या लेखनाप्रमाणेत ‘वादळी’ विषयावर व मांडणीच्या दृष्टीने रूढ लेखनशैली पेक्षा वेगळ्या आहेत हे मला माहित होते.

त्यांचा जन्म २७.२.१९२७ मालवण तालुक्यातीला आचरा या गावी झाला. प्राथमिक शिक्षणही गावीच झाले व नंतर इतराप्रमाणेत मुंबानगरीत दाखल झाले.एम्.ए.ला मराठी घेऊन घेऊन त्यांनी पदवी प्राप्त केली होती. त्यांनी ह.ना.आपटे जन्मशताब्दी निमित्त आंतरविद्यापीठीय निबंध स्पर्धेत महाराष्ट्र शासनाचे हरिभाऊ आपटे पारितोषिक प्राप्त केले होते.ते विविध नियतकालिकांतून सातत्याने कथा लेखन करत. पुढे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या विविध पदांवर त्यांनी कामे केली.कार्यवाह,कार्याध्यक्ष ते राज्य ग्रंथालय परिषदेचे सदस्य होते.ग्रंथालय संघ सुस्थिर करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.ग्रंथालय संघाच्या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले.मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे संस्थाधिपाल म्हणून कार्य केले.ग्रंथ संग्रहालयाच्या प्रमुख कचेरीसह मुंबईतील ४३ शाखा ग्रंथालयांचे आणि ३ संशोधन संस्थांचे व्यवस्थापन ते करत असत.संग्रहालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे संयोजन करत,व्याख्याने,आकाशवाणी दूरदर्शनवर कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे.मुंबईत ते ४ धनबाग,एक्सर,बोरिवली (प.) मुंबई ९२ येथे रहात.

*लेखन-*

अच्युत तारी यांची ‘खाजोळी’ हे कादंबरी रंजना प्रकाशन मुंबई. १९७४ साली प्रकाशित केली.

पुढे ‘गर्भगाठ’ ही कादंबरी इंडिया बुक कंपनी पुणे यांनी १९८३ प्रकाशित केली.

यानंतर ‘गुरु महाराज गुरु’ ही मांडणी व शैलीच्या देष्टीने वेगळी कादंबरी प्रगती प्रकाशन मुंबई यांनी १९८३ प्रकाशित केली हिची दुसरी आवृत्ती १९७९ साली प्रकाशित झाली.

त्यानंतर ‘देह मृत्यूचे भातुके’ कादंबरी इंडिया बुकनेच प्रकाशित केली

‘मोरपंखी रात्र’हा त्यांच्या कथांचा संग्रह ‘साहित्य सहकार संघ.लि.,मुंबई.१९६८ या कादंबऱ्यांपूर्वी प्रकाशित केला होता.मोरपंखी रात्र या कथासंग्रह शब्द रंजनचे दुसरे पारितोषिक मिळाले होते.या कथांची तेलगू, तमीळ भाषांतून भाषांतरे झालेली आहेत. याशिवाय छोटी जलपरी व बाटलीतला राक्षस ही अनुवादित पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.जाणता व जाणकार ग्रंथपाल म्हणून त्यांची कामगिरी महत्त्वाची मानली जाते.

*कादंबऱ्याविषयी -* ‘रंभा’ च्या १९७३ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली ‘खाजोळी’ कादंबरी तिच्या असंख्य वाचकांच्या आग्रहास्तव पुस्तकरूपाने प्रकाशित झाली.चंपा आपली जीवनकथा सांगत आहे-ताईने सहज विचारलं,’अशी काय खराब झालीस ग ?’आणि मी केवढ्याने दचकले ! काही कळण्यापूर्वीच हुंदका फुटला आणि ताईच्या कुशीत तोंड लपवलं.महिनाभर भीति वाटत होती. तोंड लपवीत होते. आज प्रसंग आला. ताईला संशय आला असेल का? की सहज विचारलं ? विचारावं तरी कसं?आणि काय सांगू !…कसं सांगू ?पण त्यानंतर ताई काहीच बोलली नाही. काही विचारलं नाही फक्त तिचा हात पाठीवरून फिरत होता.त्या स्पर्शाची माया कळत होती.नक्कीच ताईला संशय आला असावा.सहा बाळंतपणं झालेली बाई.तिला संशय आलाच असेल.

तशीच उठले आणि घरी आले. ताट वाढलं होतं. कशीतरी जेवले आणि अंथरूणावर पडले, भडभडून आलं.उताणी झाले. उशीत तोंड लपवलं तरीही हुंदके आवरेनात.धरण फुटले होते.’. (पृ.१)अवघ्या १९२ पृष्ठसंख्या असलेल्या या कादंबरीत चंपा, गंगाराम,नाना,बाबुभाय, उमावाहिनी,नाना ठाणेकर अशा व्यक्तीरेखा आहेत. चंपा आपली जीवनकथा धाडसाने सांगत आहे, तिचा पुरुषांशी आलेला शरीरसंबंध ती स्वतःच सांगत आहे.भाषा धाडसी आहे.ती म्हणते,’मी माझ्या कर्माला भिते, लग्न झाले तरी गेल्या आठवर्षांतील रंडीबाज जीवनाची पापं मला घडल्याशिवाय रहाणार नाहीत’असे ती कबूल करते,तिचे विचार अजिबात पटणारे नाहीत. ती म्हणते,’गरीबी हा शाप आहे,गरीबाला मजा करायची असेल,चांगले कपडे ,सुखी व्हायचे असेल तर स्वाभिमान विसारायला हवा,नीती अनीतीच्या कल्पना झुगारून द्यायला हव्यात.(पृ.१९०). पुढे आपल्या मनात असले घाणेरडे विचार का घोंगावू लागले ? हा तिने तिलाच विचारलेला प्रश्न वाचकांनाआपले विचार करायला प्रवृत्त करायला लावत असला तरी विवेकी मनाला हे कधीच पटणार नाही.अच्युत तारी अशा विषयावर का लिहित होते?की तत्कालीन चंद्रकांत खोत यांच्यासारख्याच्या प्रभावाखाली लिहित होते ? हे शोधायला हवे. कारण १९७९ साली प्रकाशित ‘गुरू महाराज गुरू’ या कादंबरीचा विषयही विकृतीचे चित्रण करतो.असे ऐकिवात आहे एका परिचित असलेल्या व्यक्ती ंची खाजगी प्रकरणे त्यात आहे. कुणी दिनेश पिंटो यानी ही कादंबरी प्रकाशित केली. प्रा.सुरेंद्र गावस्कर यांना अर्पण केलेल्या कादंबरीतही उपहास आणि विडंबन दिसते.पौराणिक संदर्भ घेत गुरूमाऊली’वर (त्या व्यक्तीवर)अध्याय येथे येतात.त्यातील कुत्राकुत्रीचे झेंगट, ‘दांडेकर’ (?)’भीडे-भीडे पोट वाडे ‘या म्हणीचा संदर्भ देत वामन रडेच्या करामती आप वाचते तो कलीची निर्मिती आहे. (पृ.३८) या लेखनातून लेखकांने नक्कीच एका समुहाला ‘टारगेट’करून जाणिवपूर्वक हे लेखन केले आहे,हे लक्षात येते. पौराणिक कथा संदर्भाचा आभास करून आडून मात्र आजच्या काळातील विषयांध विकृतीचे चित्रण करतात, विश्वामित्र,मनोरमा यातील व्यक्तिरेखा आहेत.१९८३ साली ‘गर्भगाठ’ प्रकाशित झाली. अनंत बल्लाळ यांनी ती प्रकाशित केली. अकक्का, लक्ष्मी,नारायण,जानकी,बाबा , नाना या व्यक्तीरेखा यात आहेत. कथानक सलग नाही.अक्काचा पती व्यसनामुळे अकाली मरतो. काका तिला पुर्नविवाहाचा आग्रह करतात.लेखक शारिरिक संंबंधाची वर्णने करतो,मानकामेशास्री असे एक पात्र निर्माण करून कादंबरीकार आपले कथानक वाचकावर लादतो.असे वाटत रहाते,’देह मृत्यूचे भातुके’ (१९८३)यातूनही प्रा.कामत आणि सुमतीची कथा येते.एकूणच तारी याना काहीतरी सनसनाटी विषय कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचे प्रयत्न केले. त्या काळात काही प्रमाणात त्यांना वाचकही मिळाला असेल पण नंतर मात्र या लेखनाची कुणी दखल घेतलेली नाही.मात्र ग्रंथालय विषयक त्यांचे कार्य व योगदान नक्कीच विशेष होते. यात शंका नाही. कोकणात आचरे सारख्या गावी बालपण,नंतरचा संपर्क यामुळे त्यांच्याकडून कोकणातील निसर्ग तेथील जीवन यांचा वेध अपेक्षित होता पण मी वाचलेल्या त्यांच्या लेखनात एक दोन अपवाद वगळता ‘कोकण’ नाही.एका विशिष्ट महानगरी संवेदना त्यांनी आपल्या कादंबरीचे विषय केले होते असे दिसते. ०००० *दुसरी ओळख-* मात्र एका कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत छाया गोडबोले त्यांच्याविषयी लिहितात – “अच्युत तारी हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होतं.तीस-पस्तीस वर्षांहून अधिक काळ घट्ट पाय रोवून त्यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला साहित्यिक जगतात.एक आगळे-वेगळे स्थान मिळवून दिलं.ग्रंथालय चळवळीचा इतिहास लिहीत असता तारी यांच्या नावाची दखल घेतल्याखेरीज पुढे जाणे शक्य नाही.या ग्रंथालय चळवळीची मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल तर ती अच्युत तारी यांनी.मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ग्रंथपाल म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी अनन्यसाधारण अशीच म्हणावी लागेल.साहित्याची विलक्षण जाण,विलक्षणवृत्ती, साहित्यिकांची मैत्री आणि कुणालाही केव्हाही मदत करण्याची वृत्ती त्यामुळे त्यांचा मित्र परिवार फार मोठा होता. माणसाची लोकप्रियता आणि दबदबा जसजसा वाढत जातो तसतशी हितशत्रुची, मत्सरग्रस्तांची संख्याही वाढत जाते.तारींच्या बाबतीतही तेच झाले.चाकोरी बाहेर जावून वाङ्मयाच्या वृद्धीसाठी काही गोष्टी तारींनी केल्या, त्याला काही विघ्नसंतोषी लोकांनी हेतू चिकटवले आणि गदारोळ निर्माण झाला.वृत्तपत्रांनी याची विविध त-हेची विपरीत प्रसिद्धी केली.’अच्युत तारी त्याला कोण मारी’ अशा सारखी म.रा.ने दिलेली शीर्षकेही आज स्मरणात राहिलेली आहेत. अशा अनेक मनःस्ताप देणाऱ्या घटना घडून देखील तारी आपल्या धृवपदावर टिकून राहिले. याचे खरे कारण एवढेच होय की,तारींना पर्याय नव्हता.तो कालही नव्हता- आजही नाही आणि उद्याही असणार नाही.ग्रंथांवर विलक्षण प्रेम असणारा,सातत्यानं एकाच विषयात स्वतःला हरवून बसणारा माणूस सापडणे कठीण असते. आज आद्ययावत असे संशोधन केन्द्र व दुर्मिळ ग्रंथसंग्रह जर कुठे पहायला मिळत असेल तर तो मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात.याचे सारे श्रेय एकट्या तारींचे आहे कुणाला ही अतिशयोक्ती वाटेल पण ती अतिशयोक्ती नसून वस्तुःस्थिती आहे.तारी ही व्यक्ती नसून एक चैतन्याने मुसमुसलेली संस्था होती.महाराष्ट्रात अनेक नादावलेली,झपाटलेली माणसं जन्माला आली म्हणूनच महाराष्ट्रात मंडळीकरण झाले. आजही पुण्यातील इतिहास संशोधन मंडळ,राजा केळकर संग्रहालय ही स्मारके या गोष्टीची साक्ष देतील.तारी अनेक वर्षे नियतकालिकातून ललित लेखन करीत होते.त्यांना प्राचीन ग्रंथांचे फार वेड होते.महाकाव्ये, कथा पुराणे यांचे सातत्याने वाचन असल्यामुळे त्यांच्या मनाला अंबा,आहिल्या,पांचाली, सत्यवती,सीमा,उर्मिला यांनीभुरळ घातली होती. आजच्या आधुनिक काळात वेगळ्या स्वरूपात पण त्याच भाववृत्तीचे दर्शन घडविणाऱ्या नायिका त्यांना भेटल्या. त्यांच्या मनाचा होणारा कोंडमारा, विफलता, खर्च, निरपराध असून भोगाव्या लागणाऱ्या यातना या त्यांनी आपल्या कथांतून हळूवारपणे टिपल्या आहेत.त्यांची ‘अहिल्या’, ‘अंबा’, ‘सत्यवती’ या कथा मनाला चटका लावून जातात. ‘मेनका’ सारखी कथा आधुनिक जगात विधिनिषेध न बाळगणाऱ्या मुक्त स्त्रीचे दर्शन घडविते रेश्मा,पांचालीही आपल्या भावविश्वाला उध्वस्त करून जातात.या सर्व कथा वेगवेगळ्या नियतकालिकांतून वेगवेगळ्या मनःस्थितीत जरी लिहिल्या गेल्या असल्या तरी त्या सर्व नायिका एका सूत्रात बद्ध आहेत. या सर्व नायिका वाचकाला एक वैश्विक अनुभव देऊन जातात. या कथांत कुठेही थिल्लरपणा,पसरटपणा आलेला नाही. हा कथासंग्रह एकदा वाचायला सुरूवात केल्यावर तो पूर्ण वाचल्याशिवाय वाचकाला स्वस्थ बसू देत नाही. ऐवढेच नव्हे तर या कथा वाचकाला काहीसे बेचैने करून सोडतात.विषण्णतेचा भाव मनात जागा होतो.मानवी मनाचे पापुद्रे हळूवारपणे आपल्या समोर उलगडत जातात. दीर्घकाळ स्मरणात रहावा असा हा संग्रह आहे.वाचक त्याचे नक्कीच स्वागत करतील असा उदंड भरवसा आहे.अच्युत तारी यांच्या गळ्यात जसे हार पडले तसेच त्यांना प्रहारही सोसावे लागले.अवहेलना,उपेक्षाही त्यांच्या वाट्याला भरपूर आली. त्यांच्या आयुष्याच्या जमाखर्चाचे जर सार्थ वर्णन करायचे झाले तर मला या ठिकाणी सुरेश भटांच्या या कवितेची आठवण होते.

‘हा वापरून गेला, तो ठोकरून गेला, जो भेटला मला तो वांदा करून गेला!’ या संग्रहाच्या प्रकाशनाचेही दशावतार झाले. गेली दोन अडीच वर्षे या नायिका प्रसिद्धीसाठी खोळंबून उभ्या आहेत.आज प्रमोद अडकर या धडपड्या,चीर तारूण्याचे कारंजे असलेल्या प्रकाशकाने मनावर घेतले आणि भरजरी वस्त्रे लेऊन या नायिका आज आपल्या पर्यंत पोचल्या आहेत.आज तारी तुम्हाला दिलेले अभिवचन मला पूर्ण करता आले याचे सारे श्रेय तुमच्या स्वस्थ न बसू देणाऱ्या नायिकांचेच आहे !”अच्युत तारी यांच्या निमित्ताने एक गौरवांक प्रकाशित झाला होता. त्याचे संपादक लिहितात. “महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचे अध्वर्यु, ज्येष्ठ हितचिंतक व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कर्तबगार संस्थाधिपाल अच्युत तारी यांनी दिनांक २७ फेब्रुवारी रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण केले. सुप्रसिद्ध लेखक,कुशल संघटक व साहित्यिकांचे जिव्हाळयाचे मित्र म्हणून तारी महाराष्ट्रात सुपरिचित आहेत.मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला महाराष्ट्रात किंबहुना भारतात,लाभलेल्या अपूर्व यशाने तारी साहेबांचे कर्तृत्व घडले आहे,असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथसंग्रहालयाच्या सेवक वर्गाने दि.१ मार्च रोजी आयोजित केलेला अभिनंदनपर समारंभ अतिशय हृद्य व संस्मरणीय ठरला. आचरे गावी शिक्षण झाल्यावर ते नोकरीसाठी श्री. तारी मुंबईला गेले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात नोकरी पत्करून श्री.तारी यांनी नोकरी संभाजून मुंबई विद्यापीठाची एम् ए. पदवी संपादन केली. तारी यांचा मूळ पिंड साहित्यिकाचा, कॉलेजमध्ये शिकत असताना के. हरिभाऊ आपटे जन्मशताब्दी-निमित्त महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या आंतरविद्यापीठीय स्तरावरील निबंध स्पर्धेत श्री. तारी यांच्या निबंधाला पहिलं पारितोषिक मिळाले होते कथास्पर्धेत मोरपंखी रात्र’ या त्यांच्या कथेला द्वितीय पारितोषिक मिळाले होते. त्यांचा पहिला कथासंग्रह ‘मोरपंखी रात्र’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. आहेत.’कथा-वाचन हा श्री. अच्युत तारी यांचा आवडता छंद होता. हा त्यांचा छंद लक्षात घेऊन मालवण येथे झालेल्या पहिल्या मालवणी स्नेहसंमेलनात कथाकथनाच्या कार्यक्रमाचे संयोजन अच्युत तारी यांच्यावर सुपुर्द करण्यात आले होते.नोकरीच्या निमित्ताने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आलेने तारी ग्रंथालय चळवळीशीही एकरुप झाले.अच्युत तारी यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ महाराष्ट्राला सतत मिळाला.

मुंबईत त्यांचे निधन झाले आणि ग्रंथालय क्षेत्रातील एका जाणकाराला आपण मुकलो. त्यांच्या एकसष्ठीनिमित्ताने गौरवांक प्रसिद्ध झाला होता.

मुंबईत ४आॕगस्ट१९९५ साली त्यांचे निधन झाले.

————————————— संदर्भ सहाय्य-मा.उमा नाबर,श्रीराम धुरी,श्री.कुबल