बालदिनानिमित्त गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची खेडमधील शाळांना भेट; विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद

खेड – बालदिनाच्या निमित्ताने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल आणि श्री. नारायण काशिराम जूनिअर कॉलेज, आंबवली यांना भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या आगमनाने शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या भेटीदरम्यान राज्यमंत्री कदम यांनी विद्यार्थ्यांशी शिक्षण, करिअर नियोजन आणि भविष्यातील संधी या विषयांवर सविस्तर व मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही त्यांना विविध प्रश्न विचारत आपले शंका निरसन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये रूजवलेल्या मूल्यांचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रयत्नांचे कदम यांनी विशेष कौतुक केले. शाळेतील वातावरणाचा आढावा घेताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता, आत्मविश्वास आणि प्रगतीची भावना वाढीस लागावी यासाठी प्रोत्साहनपर संदेश दिला. बालदिन हा सर्जनशीलता आणि स्वप्नांना पुन्हा उजाळा देण्याचा दिवस असून, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवत पुढे जावे, असा संदेश त्यांनी दिला. राज्यमंत्री कदम यांच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासात नवउमेद आणि ऊर्जा मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले.