विजय मोर्ये, सुवर्णा राघव यांना महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार

 रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मान्यवरांचा राज्यस्तरीय गौरव

चिपळूण : ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार-२०२५” हा राज्यस्तरीय सन्मान यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील दोन उल्लेखनीय कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात आला. लांजा येथील विजेता विजय मोर्ये आणि राजापूर येथील सुवर्णा गणपत राघव यांना त्यांच्या सामाजिक योगदानाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
विजेता विजय मोर्ये यांना सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक उपक्रम, कला क्षेत्रातील योगदान, तसेच वंचित घटकांसाठी केलेल्या सामाजिक हस्तक्षेपाची राज्यस्तरावर दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. तर सुवर्णा गणपत राघव, अधीक्षिका- वात्सल्य मंदिर ओणी बालगृह, राजापूर यांना २२ वर्षांपासून अनाथ, एक पालक, वंचित व विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसन, संरक्षण आणि शिक्षणासाठी केलेल्या निःस्वार्थ व निरपेक्ष सेवेसाठी “महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार- २०२५” प्रदान करण्यात आला. त्यांच्या सातत्यपूर्ण सेवेमुळे असंख्य बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार खालील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ. नितीन वाघमोडे, आयकर विभाग आयुक्त, पुणे प्रा. शिवाजी खांडेकर, सरचिटणीस, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ, महाराष्ट्र राज्य ॲड. प्रियदर्शनी कोकरे, सुप्रसिद्ध व्याख्यात्या डॉ. सारिका शहा, मिसेस इंडिया २०१८ व मिसेस वर्ल्ड २०२१ डॉ. ॲड. अंजना खताळ, ज्येष्ठ विधीज्ञ, मुंबई उच्च न्यायालय पुणे येथे आयोजित सोहळा भव्य दिमाखात पार पडला. विविध सामाजिक, प्रशासकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दोन्ही पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.
विजेता विजय मोर्ये यांनी सांगितले की, “हा पुरस्कार माझ्या सामाजिक आणि कलाक्षेत्रातील कार्याला नव्याने प्रेरणा देणारा आहे.” तसेच सुवर्णा गणपत राघव यांच्या दीर्घ सेवायात्रेचा गौरव करत मान्यवरांनी त्यांचे काम “समाजासाठीची खरी प्रेरणा व मार्गदर्शन” असल्याचे मत व्यक्त केले. या राज्यस्तरीय सन्मानामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त करण्यात येत असून दोन्ही कार्यकर्त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.