चिपळूणमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत; अनेकांचे तोडले लचके

लहान मुले, अबालवृद्धाना धोका
नगर परिषदेने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरासह ग्रामीण भागात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. हे कुत्रे नाक्या नाक्यावर, आडोशाला झुंडिंने आढळतात. अनेकवेळा ते येणाऱ्या जाणाऱ्याचा चावा घेतात. काहीवेळा पाठलाग करून लचके तोडतात. रात्रीच्यावेळी किंवा सकाळी दुचाकी, चारचाकी वाहनांचा पाठलाग करतात. या मुळे अपघात होऊ शकतो. लहान मुले व आबालवृधाना याचा धोका असल्याने नगरपरिषदेने या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी दादा खातू यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

चिपळूण शहरात सध्या मोकाट कुत्रे झुंडीने धावताना आढळतात. हे कुत्रे लहान मुले, विद्यार्थी, अबालवृद्ध यांचा पाठलाग घेतात. काहीवेळा त्यांना चावतात. काहीवेळा दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहनांचाही पाठलाग करतात, यामुळे अपघात होण्याचा मोठा धोका असतो. आतापर्यंत अनेक लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांना कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले आहे. कुत्र्यांची दहशत वाढली असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दादा खातू यांच्यावरही दुचाकीवर असताना कुत्रानी हल्ला केला व दोन कुत्र्यांनी त्यांच्या दोन्ही पायांना चावा घेतला. अशा अनेक घटना दररोज घडत आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न नसबंदी करून नगरपरिषदेने केला होता, परंतु त्यात फारसे यश आले नाही. यात लाखो रुपये वाया गेले. या कुत्र्यांना केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार मारताही येत नाही. मग एकत्र पकडून दूर अभयारण्यात सोडावे म्हणजे नैसर्गिक अन्नसाखळीत अधिवासात सोडावे. कुत्र्यांची वाढती संख्या पाहता भविष्यात आणखी मोठा अनर्थ घडू नये यासाठी नगरपरिषदेने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.