घरोघरी होणार तपासणी
गुहागर : तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार असून दि. १७ नोव्हेंबर ते दि. २ डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेमध्ये आरोग्य टीम मार्फत घरोघरी जाऊन सर्व महिला व पुरुष यांची शारीरिक तपासणी करून नवीन रुग्ण आढळून आल्यास त्यांना उपचार देण्यात येणार आहे. तसेच संशयित रुग्णाची तपासणी करून वैद्यकीय अधिकारी निश्चित निदान करणार आहेत.
सदर मोहिमेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण तालुकास्तरावर आणि प्रा. आ. केंद्र स्तरावर घेण्यात आले आहे. मोहिमेची माहिती आणि प्रसिद्धी आशा मार्फत करण्यात येत आहे. एकूण १० लाख ७ हजार ९१२ लोकसंखेसाठी ९३ टीम कार्यरत राहणार असून १८६ सदस्य व १९ पर्यवेक्षक तसेच प्रत्येक तपासणी पथकात दोन सदस्य असणार आहेत. तर एक आशा आणि एक पुरुष स्वयंसेवक यासोबत असणार आहेत. शरीरावर न खाजणारा न दुखणारा फिकट लालसर पांढरा रंगाचा चट्टा असल्यास आरोग्य टीम कडून तपासणी करून घ्यावी. तसेच खाजगी रुग्णालयात कुष्ठरोग संशयीत रुग्ण आढळून आल्यास खाजगी डॉक्टरांनी आरोग्य विभागास माहिती द्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांनी केले आहे.












