
मसुरे (प्रतिनिधी ): मालवण तालुक्यातील राठीवडे भाकरदेव नदी किनारी जंगल भागात अज्ञाताने लावलेल्या फासात अडकलेल्या बिबटयाची वन विभागा कडून सोमवारी सायंकाळी उशिरा सुटका करण्यात आली. संतोष मधुसूदन तळवडेकर हे आपल्या नदी किनारी असलेल्या जमिनीत मजुरांसोबत काम करीत असताना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांना नदी किनारी जंगलात वाघाची डरकाळी कानावर आली. त्यांनी कानोसा घेतला तेव्हा जवळच नदी किनारी असलेल्या जंगलात कमरेला फास लागून बिबट्या वाघ अडकून पडलेला दिसला. मधुसूदन तळवडेकर, सुशांत धुरी यांनी वन विभागाला कळविले त्या नुसार वन विभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल संदिप कुंभार, वनपाल सदानंद परब, वनसंरक्षक अतुल खोत, वनसंरक्षक लक्ष्मण आणले,वाहन चालक राहुल मयेकर, कुडाळ पोलिस हेड कॉन्स्टेबल वंजारे,पो.पटील संदेश धुरी यांनी बिबट्याची सुखरूप सुटका करून वैधकीय तपासणी साठी कुडाळ येथे नेले. फासकी लावणाऱ्याचा वनविभाग शोध घेत असून फासकी लावणाऱ्याचे नाव कळविणाऱ्यास बक्षीस देऊन नाव गुप्त ठेवण्यात येईल असे वनविभागाकडून वनपाल सदानंद परब यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक ग्रामस्थ अरुण मेस्त्री, कृष्णा पुजारे,कृष्णा हर्णे, प्रकाश मेस्त्री, सुभाष मेस्त्री, संकेत मेस्त्री, माजी उपसरपंच स्वप्नील पुजारे यांच्या सह राठीवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.













