खेड नगरपरिषद निवडणूक रंगात — थेट शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शहरात राजकीय तापमान वाढले

खेड :
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या असून महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या घोषणेनंतर राज्यभरात निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषदेसाठीही या प्रक्रियेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दहा प्रभागांमध्ये 20 जागांसाठी निवडणूक होत असून नगराध्यक्ष पद थेट जनतेतून निवडून येणार आहे.
या निवडणुकीसाठी एकूण 90 उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत 21 अर्ज अवैध ठरले आणि 69 उमेदवार अंतिम यादीत राहिले. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 19 उमेदवारांनी स्पर्धेतून माघार घेतली असून आता फक्त 50 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी एकूण आठ अर्ज दाखल झाले होते. छाननीत तीन अर्ज अवैध ठरले तर दोन उमेदवारांनी मागे घेतल्याने अखेर तीनच उमेदवार समोरासमोर उभे राहिले आहेत. यात शिवसेनेच्या माधवी राजेश बुटाला, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सपना ऋषिकेश कानडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सीमा जाधव या तिघींमध्ये थेट सामना रंगणार आहे.
खेड शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. शिवसेना नेते रामदास कदम आणि माजी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या तालुक्यामुळे या क्षेत्रात शिवसेनेचे वर्चस्व दीर्घकाळ टिकले. मात्र मनसे स्थापनेनंतर खेडचे राजकारण मोठ्या प्रमाणात बदलले. मनसे नेते वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 15 वर्षे खेड नगरपरिषदेवर मनसेचा झेंडा फडकला होता. वैभव खेडेकर यांना मनसेतून बडतर्फ केल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने उमेदवारही उभे केले. तथापि, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत खेड नगरपरिषदेच्या जागावाटपात भाजपला तीन आणि शिवसेनेला 17 जागा मिळाल्या. नगराध्यक्ष पदही शिवसेनेकडे सोपवण्यात आले. मात्र या संपूर्ण जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही जागा न मिळाल्यामुळे महायुतीमध्ये नाराजीचे सूर उमटताना दिसले.
दुसरीकडे शहरात महाविकास आघाडीचीही निर्मिती झाली असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसे असे पक्ष एकत्र आले आहेत. परंतु आघाडीमध्ये मनसेला कोणतीही जागा देण्यात आली नसल्याने मनसेचे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांनी मशाल चिन्हावरून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसेचे अस्तित्व कमी होत असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे. नागरीकांतही या राजकीय समीकरणांवर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे.
सध्या खेड शहरात सर्वच पक्षांनी प्रचाराला वेग दिला असून उमेदवार घरोघरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत. मतदारांशी संवाद, मोहिमा, रॅली, लहान-मोठ्या सभा आणि कार्यकर्त्यांची धावपळ यामुळे शहरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. खेड नगरपरिषद निवडणूक दोन डिसेंबर रोजी होणार असून निकाल तीन डिसेंबरला जाहीर केला जाईल. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी थेट लढत रंगणार असून ही लढत कोण जिंकणार, नागरिक महायुतीसोबत जातात की महाविकास आघाडीकडे पाठिंबा देतात, हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष खेडकडे लागले आहे.