टीईटी विरोधातील मोर्चात शिक्षक संघ ताकदीने उतरणार- अजय गराटे

चिपळूण (प्रतिनिधी)–:- टीईटी विरोधात ५ डिसेंबरला राज्यभरात शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीतर्फ महामोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ताकदीने सहभागी होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अजय गराटे यांनी दिली.

यावेळी ते म्हणाले की, सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केल्यामुळे देशभरातील व राज्यातील लाखो शिक्षकांच्या नोकरीवर संकट निर्माण झाले आहे. या संकटातून मार्ग काढण्याऐवजी राज्य सरकारकडून जबाबदारी झटकण्याचा प्रकार पहायला मिळत आहे. देशातील उत्तरप्रदेश, उत्तराखंड तामिळनाडू सरकारने टीईटी सक्ती निर्णय विरोधात कायदेशीर पावले उचलली असताना एकट्या महाराष्ट्र सरकारलाच पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी काय कायदेशीर अडचण आहे असा सवाल आहे.सरकारने टीईटी निर्णय विरोधात ठोस भूमिका घ्यावी यासाठी राज्यभरातील शिक्षक ५ डिसेंबर रोजी शाळा बंद ठेऊन मोर्चा काढणार आहेत. अशी माहिती गराटे यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले की, याबाबत शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात व राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा रत्नागिरी पूर्ण ताकदीने मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. रत्नागिरी जिल्हयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अजय गराटे यांच्यासह शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.