चिपळूण : मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल येथे नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महाविद्यालय अंतर विभागीय स्पर्धेत कोकण विभागाच्या कबड्डी संघाने उल्लेखनीय कामगिरी करत पहिल्यांदाच रौप्य पदक मिळवले. या ऐतिहासिक यशामध्ये संघाचे प्रशिक्षक जितेंद्र कदम यांचे मोलाचे योगदान राहिले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने उत्कृष्ट खेळ करून कोकणाला अभिमान वाटेल असे यश मिळवले. या यशाबद्दल आमदार शेखर निकम यांच्या हस्ते प्रशिक्षक जितेंद्र कदम यांचा मिरजोळी येथील श्री महालक्ष्मी-साळुबाई मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, पांडुरंग माळी, विनोद कदम, निलेश कदम, अमित सावंत, राजू जाधव, रुपेश इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आ.निकम यांनी कबड्डी संघाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सांगितले की, संघाला काही अडचण आली किंवा मदतीची गरज भासली, तर मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संघाच्या या ऐतिहासिक यशामुळे कोकणातील क्रीडाप्रेमी आणि कबड्डी चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.











