कणकवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीपूर्वी पोलिसांची कडक तयारी

कणकवली : कणकवलीमध्ये आज सायंकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर हे कणकवलीत दाखल झाले. दहिकर यांनी शहरातील विविध ठिकाणी पाहणी केली तसेच स्थिर सर्वेक्षण पथकाला प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले. “योग्य माहिती घ्या, परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ तपास करा आणि चौकशी करा,” अशा सूचना त्यांनी पथकातील अधिकाऱ्यांना दिल्या.

 

यासोबतच बैठकी दरम्यान वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले. शहरात पोलिसांचे कडक बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थापन तैनात करण्यात आले असून सुरक्षिततेचे सर्व उपाय योजण्यात आले आहेत.