तर शिवसेना-भाजप युतीकडून उमेश सकपाळ प्रथमच निवडणूक रिंगणात
तर उर्वरित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची कसोटी पणाला!
चिपळूण :— चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांसाठी सर्वच प्रभागातील नगरसेवक पदाची निवडणुकी अतिशय चुरशीची होणार आहे काही प्रभागात दुरंगी तर काही प्रभागात पंचरंगी तर काही प्रभागात सप्तरंगी लढती होणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. विशेष म्हणजे या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार तथा माजी नगराध्यक्ष रमेश कदम पुन्हा एकदा चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्ष पदासाठी आपले नशीब आजमावत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तर शिवसेना-भाजप युतीचे उमेश सकपाळ, काँग्रेसकडून सुधीर शिंदे, शिवसेना उबाठा पक्षातर्फे राजू देवळेकर, अपक्ष म्हणून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार लियाकत शाह समाजवादी पार्टीकडून मोइन सदाकत पेचकर, निशिकांत भोजने हे देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत . एकंदरीत नगराध्यक्ष पदासाठी सप्तरंगी लढत होत असल्याने यामध्ये कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी ‘डोअर टू डोअर’ प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. अजूनही ‘ना कॉर्नर सभा, ना जाहीर सभा’, यामुळे या निवडणुकीला तितकीशी रंगत चढताना दिसत नाही. चिपळूण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १ अ सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून काँग्रेसकडून मिस्बाह नाखुदा, राष्ट्रवादी काँग्रेस कडून केतकी बांद्रे, शिवसेनेकडून प्रतीक्षा हरवदे या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. प्रभाग क्रमांक १ ब सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असून यामधून शिवसेनेकडून उदय जुवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विशाल राऊत, शिवसेना उबाठाकडून संकेत शिंदे ,राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून आरिफ हजवानी, प्रभाग क्रमांक दोन अ नागरिकांचा प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित असून यामध्ये दुरंगी लढत होत आहे. या प्रभागातून दोन्ही माजी नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रुक्सर अलवी, काँग्रेसकडून सफा गोठे पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत. प्रभाग क्रमांक दोन ब सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असून यामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी नगरसेवक कबीर कादरी पुन्हा एकदा आपले नशीब अजमावू पाहत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून अब्दुल कादिर रहिमान परकार, शिवसेना उबाठाकडून अनवर पेचकर , शिवसेनेकडून फैसल मेमन, काँग्रेसकडून साजिद सरगुरोह तर अपक्ष म्हणून मुनीर सहिबोले निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये कबीर कादरी व साजिद सरगुरोह यांच्यात कडवी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रभाग क्रमांक तीन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित असून या प्रभागासाठी तृप्ती सुधीर कदम अपक्ष, भाजपकडून रुपाली दांडेकर, काँग्रेस कडून माजी नगरसेविका स्वाती दांडेकर, अपक्ष म्हणून प्रिया शिंदे तर शिवसेना उबाठा करून वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात आहेत. या प्रभागातून निवडणूक लढवत असलेल्या स्वाती दांडेकर यापूर्वी शिवसेनेकडून निवडून आल्या होत्या. नंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश देखील केला होता. मात्र , आता त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक तीन ब सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असून या प्रभागातून काँग्रेसकडून संदीप आग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून अक्षय कुडाळकर, शिवसेनेकडून प्रमोद बुरटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इम्तियाज मुकादम, शिवसेना उबाठा पक्षाकडून निकेत हरवंदे तर अपक्ष म्हणून अब्दुल कादिर मुकादम निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
प्रभाग क्रमांक चार अ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून या प्रभागातून भाजपकडून माजी नगरसेवक राहिलेले आशिष उर्फ मकरंद खातू, अपक्ष म्हणून संदेश फके, शिवसेना उबाठा पक्षाकडून अजय भालेकर अशी तिरंगी लढत या प्रभागात होणार आहे. प्रभाग क्रमांक ४ ब सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून शिवसेना उबाठा कडून वैशाली कदम तर शिवसेनेकडून सुरय्या फकीर यांच्यात दुरंगी लढत होणार असून फकीर या माजी नगरसेविका राहिल्या आहेत. तर सूर्या फकीर यांचे पती महमद फकीर हे देखील माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष राहिलेले असल्याने फकीर यांना या प्रभागाचा चांगला अभ्यास असल्याने ते यामध्ये बाजी मारतील असे बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक ५ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी आरक्षित असून या प्रभागात दुहेरी लढत होणार आहे . शिवसेना शिंदे गट पक्षाकडून निहार कोवळे तर शिवसेना उबाठा पक्षाकडून शैलेश टाकळे, प्रभाग क्रमांक ५ ब सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नसरीन खडस तर भाजपकडून रुही खेडेकर यांच्यात दुहेरी लढत रंगणार आहे. एकंदरीत पहिल्या पाच प्रभागात दुहेरी, पंचरंगी, सप्तरंगी अशा लढती होणार असून यामध्ये कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर उर्वरित ९ प्रभागांचा आढावा गुरुवारी घेतला जाणार आहे.












