रत्नागिरीत पेट्रोल पंपावर ‘सुट्ट्या’ पेट्रोल-डिझेल विक्रीला बंदी

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

​रत्नागिरी:
​देशाच्या राजधानीत झालेल्या नुकत्याच एका दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षा यंत्रणांनी रत्नागिरी जिल्ह्यात विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या, दहशतवाद विरोधी शाखेने एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना आणि मालकांना ‘सुट्ट्या’ पेट्रोल किंवा डिझेल कोणत्याही कॅन, बाटलीयातून कोणाकडेही विक्री न करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

​दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी दिल्ली येथे झालेल्या कथित दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने, संभाव्य घातपात आणि पुढील दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल पंप मालकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच यासंबंधीची सूचना पंपावरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती दहशतवाद विरोधी शाखेने केली आहे. या निर्णयामुळे आता रत्नागिरीतील पेट्रोल पंपांवर ‘सुट्ट्या’ पेट्रोल/डिझेल मिळणार नसल्याचे फलक लावण्यात आले आहेत.