गेली पाच वर्षे सिंधुदुर्गात केले होते चांगले काम
सिंधुनगरी | प्रतिनिधी
सिंधुदुर्गचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे यांची सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून बदली झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी कोरोना काळासह गेली पाच वर्षे चांगली आरोग्य सेवा दिली होती. बदली पात्र असताना व गेले काही महिने ते बदलीच्या प्रतीक्षेत असताना मंगळवारी त्यांच्या बदलीचा आदेश झाला. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार व जिल्हा आरोग्य विभागाचा कारभार त्यांच्या नियंत्रणाखाली सुरळीत होता. अद्याप सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली नाही.
डॉ महेश खलीपे हे २०१८ पासून गेली पाच वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम करत होते.या कालावधीत त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगली रहावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. कोरोना कालावधीतही जिल्हा वासियांना व्यवस्थित आरोग्य सेवा मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते.या कालवधित त्यांनी सुट्टीही घेतली नव्हती.डॉ खलीपे हे या पूर्वी सन २०११ ते २०१४ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम केले होते.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी पदी रात्री उशिरा पर्यंत कुणाचीही नियुक्ती झाली नव्हती. डॉक्टर खलीपे यांनी आरोग्य सेवेस समाधानकारक काम केले होते. जिल्हा आरोग्य यंत्रणा, साथ रोग नियंत्रण कक्ष जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार, राष्ट्रीय आरोग्य अभियान या सर्वच कार्यक्रमात त्यांनी चांगले नियंत्रण ठेवले होते.











