सावंतवाडीत नगरपरिषद निवडणूकीसाठी सरासरी ६९ टक्के मतदान

किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. शहरातील एकूण २१ केंद्रावरील १९४२९ मतदारांपैकी सुमारे १३ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सरासरी ६९ टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. प्रत्यक्ष किती मतदान झाले याची आकडेवारी उशिरापर्यंत मिळू शकली नाही.

मंगळवरी सकाळी ७.३० वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या प्रहरात मतदानाचा टक्का कमी होता मात्र संध्याकाळी उशिरा मतदारांनी केंद्रावर गर्दी केलेली दिसली. या मतदानात दिव्यांग तसेच वृद्ध यांनीही सहभाग घेतलेला प्रकर्षाने दिसून आला. सर्वच पक्षांकडून आपापले मतदार केंद्रावर आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जात होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये सकाळी ११ च्या सुमारास दोन गटांत झालेल्या किरकोळ बाचाबाचामुळे थोडेफार वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र त्यानंतर संध्याकाळपर्यंत वातावरण शांत होते. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार
पडली.

भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांचे कुटुंबियांसमवेत मतदान

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी कुटुंबीयांसमवेत मतदान केले. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी राजे खेमसावंत भोंसले, राणी शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले व उर्वशी भोंसले आदी उपस्थित होते.

*आम. दीपक केसरकर यांनी सपत्नीक
बजावला मतदानाचा हक्क*

माजी शालेय शिक्षण मंत्री आम. दीपक केसरकरांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडीकरांचा प्रतिसाद पाहता चांगला निकाल येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खंडपीठाचा निर्णय मान्य करावा लागेल. तसेच निकाल चांगला येईल असा विश्वास व्यक्त केला.

ना. नितेश राणे यांनी सावंतवाडीत भेट देत घेतला बुथनिहाय आढावा

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सावंतवाडी शहरात भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन मतदानासंदर्भात बूथनिहाय आढावा घेतला. त्यावेळी कार्यकर्ते व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित असून गुलाल आम्हीच उधळणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजप व सेनेकडून विजयाचा दावा
संध्याकाळी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्वच पक्षांनी विजयाचा दावा केला. त्यात विशेष करून भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेनेकडून आपणच विजयी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. इतर पक्षांनीही आपल्या विजयाचा दावा केला.

प्रभाग क्रमांक ९ मध्ये दोन गट भिडले

गाडी अंगावर घातल्याचा आरोप : चालकाला धक्काबुक्की
सावंतवाडी शहरातील एका नेत्याच्या ताफ्यातील गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांने सदर गाडी रोखली. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले. तणाव वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. यात संबंधित चालकाला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. सदरची गाडी पोलिसांनी ताब्यात घ्यावी तसेच संबंधितावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी उपस्थितांनी केल्यानंतर गाडी ताब्यात घेत पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेली. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जमा झाले होते.