खेडमध्ये 62% मतदानानंतर महायुतीचा जल्लोष; जोरदार आतषबाजी, शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास

खेड (प्रतिनिधी) :
खेड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज 62 टक्के मतदानाची नोंद झाली असून, सकाळपासून संध्याकाळपर्यंत उत्साहवर्धक वातावरणात ही प्रक्रिया पार पडली. मतदारांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी मतदान प्रक्रिया पूर्ण होताच शहरातील महायुतीच्या (शिवसेना–भाजपा) कार्यालयाबाहेर आनंदोत्सवाची लाट उसळली. सुमारे साडेसहाच्या सुमारास कार्यकर्त्यांनी विजयी संकेत मानत भव्य फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. जवळपास अर्धा तास सलग धडाडणाऱ्या फटाक्यांनी परिसर दणाणला, तर आकाशात झेपावणाऱ्या स्काय शॉट्सने वातावरणात उत्साहाची रंगत वाढवली.
यावेळी कार्यकर्त्यांनी “खेड नगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल” असा ठाम निर्धार व्यक्त करत नगराध्यक्ष पदासह 20 ही नगरसेवक पदे महायुतीच्या खात्यात जातील, असा विश्वास व्यक्त केला. जागोजागी घोषणाबाजी, ढोल-ताशांच्या तालावर नाचणारे कार्यकर्ते आणि पक्ष कार्यालयात झालेला उत्स्फूर्त जल्लोष यामुळे शहरात निवडणूक निकालाची चाहूल लागल्यासारखे वातावरण निर्माण झाले.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचे मार्गदर्शन आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रचारातील सक्रीय धडाकेबाज भूमिका लक्षवेधी ठरली. प्रभागनिहाय दौरे, मतदारांशी प्रत्यक्ष संवाद, स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका आणि संघटनशक्तीला दिलेला जोर यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला होता. निवडणुकीचा निर्णय आता मतपेटीत बंद झाला आहे. खेड नगरपालिकेवर नेमका कोणाचा झेंडा फडकेल, हे पाहण्यासाठी सर्वांचे डोळे 21 डिसेंबरच्या निकालावर खिळले आहेत.