उत्कृष्ट सेवा बजावणारे एक्स-रे टेक्निशियन निखिल बावकर यांची कुडाळ येथे बदली

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा

​सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांपासून २४ तास अखंड व उत्कृष्ट एक्स-रे सेवा पुरवणारे एक्स-रे टेक्निशियन निखिल बावकर यांची कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात बदली झाली आहे. रुग्णसेवा आणि सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानाबद्दल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

​उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असताना निखिल बावकर यांनी रुग्णांना दिवस-रात्र उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे ते अल्पावधीतच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांमध्ये लोकप्रिय झाले. त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे ते प्रतिष्ठानचे चांगले मित्र बनले होते.

​निखिल बावकर यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रतिष्ठानने त्यांच्या पुढील वाटचालीस उत्तमोत्तम यश मिळो अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

​ नवनियुक्त एक्स-रे टेक्निशियन आसिफ सनदी यांचे स्वागत
​यावेळी, निखिल बावकर यांच्या जागी नवनियुक्त झालेले एक्स-रे टेक्निशियन आसिफ सनदी यांचेही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्वागत केले. ​निखिल बावकर हे यापुढे ग्रामीण रुग्णालय, कुडाळ येथे आपली सेवा बजावणार आहेत.

समारंभाप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव व लक्ष्मण कदम, ईसीजी टेक्निशियन मनोज सावळे, कॅज्युअल्टी इन्चार्ज सिस्टर सुप्रिया नाईक, डॉ. क्रांती, डॉ. प्रिया, डॉ. सिद्धेश्वर, शुभांगी कट्टीकर, सिटीस्कॅन टेक्निशियन प्रथमेश परब, स्वप्नील, आणि सिस्टर कांचन कुंडईकर यांच्यासह रुग्णालयातील अन्य मान्यवर उपस्थित होते. निखिल बावकर यांच्या बदलीने रुग्णालयातील सहकाऱ्यांनी त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.