राजापुरात देवीहसोळ गावात बिबटयाच्या संशयास्पद मृत्युने खळबळ

फासकीत अडकून मृत्युमुखी पडलेल्या बिबटयाच्या हाता पायाचे पंजे गायब
बिबटयाच्या मृतदेहाचे विद्रुपीकरण
सोशल मिडायावरील व्हायरल पोस्टने प्रकार उघड
वनविभाग मात्र अनभिज्ञ

राजापूर : तालुक्यातील देवीहसोळ गावामध्ये नदीकिनाऱ्यालगत एका स्थानिक ग्रामस्थाच्या मालकीच्या माडाच्या बागायतीमध्ये फासकीमध्ये अडकलेल्या बिबटयाच मृत्यु झाल्याची घटना घडली असून या मृत बिबटयाची शिकार करून त्याच्या पायाचे व हाताचे पंजे कापून घेण्यात आले असून त्या मृत बिबटयाला लगतच असलेल्या नदीमध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
या बिबटयाचा मृतदेव आता सडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून एवढे होऊनही याबाबत कुणीच माहिती न दिल्याने या बिबटयाच्या मृत्यु प्रकरणात संशय वाढला आहे.
सोशल मिडियावर याबाबची माहिती व फोटो व्हायरल झाल्यानंतर आता वनविभागाला जाग आली असून वनविभागाचे अधिकारी शनिवारी सायंकाळी घटथस्थळी रवाना झाले आहेत.
मात्र अशा प्रकारे या बिबटयाला फासकीत मारून त्याचे अवयव काढून नेणाऱ्यांचा वनविभाग व पोलीसांनी कसून शोध घ्यावा व कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्राणी प्रेमींकडून होत आहे.
तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावात बिबटयाचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती असलेली पोस्ट त्या गावातील अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर फिरत आहे. या बिबटयाच्या मृतदेहाचे विद्रूप स्वरूप, हातापायाचे छाटलेले पंजे या चर्चेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदरचे गाव हे देविहसोळ असल्याचे पुढे आले आहे.
मात्र याबाबत राजापूर वनविभागाला काहीच थांगपत्ता असल्याचे पुढे आले आहे. अशा प्रकारे बिबटयाचा मृत्यु झाल्याची पोस्ट सोशल मिडियावर फिरत असतानाही वनअधिकारी याकडे का दुर्लक्ष करत आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अशा घटनेचे तातडीने पंचनामे, तपास व नमुने संकलन अपेक्षित असते मात्र याबाबत वनविभागाच अनभिज्ञ असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
या प्रकरणी वनविभागाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा प्रकारे बागेत बिबटया फासकीत अडकलेला असताना बाग मालकांनी का कळविले नाही, स्थानिक पोलीस पाटील यांनीही याबाबत काहीच माहिती का दिली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर बिबटया या संरक्षित प्राण्याबाबत एवढी बेफिकीरी कशी काय असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
वनविभागाकडून तपास सुरू- जयराम बावदाणे
तालुक्यातील देवीहसोळ गावात नदीकिनाऱ्यालगत अशा प्रकारे बिबटयाचा मृतदेह असल्याची सोशल मिडियावरिल पोस्ट आपल्याकडेही शनिवारी दुपारी आली. आपण तातडीने त्याची दखल घेतली असून पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती राजापूर वनपाल जयराम बावदाणे यांनी दिली आहे. या प्रकरणी पंचनामा करून योग्य ती कारवाई केली जाईल असेही बावदाणे यांनी सांगितले.