आगामी जि.प.व पं.स. निवडणुका स्वबळावर लढण्याचा देवरुख तालुका काँग्रेस कमिटीचा निर्णय

लांजा येथे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांच्या समवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

लांजा ( प्रतिनिधी) आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून नाही तर काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय देवरुख तालुका काँग्रेस कमिटीने घेतला असून याबाबत आज शनिवारी लांजा येथे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांच्या समवेत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले .
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवरुख- संगमेश्वर तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक आज शनिवारी जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत लांजा येथे पार पडली. या बैठकीत देवरुख काँग्रेस तालुकाध्यक्ष काशीराम वाजे व पदाधिकारी यांनी या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढविणार असल्याचा सूर व्यक्त केला. या निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या दृष्टीने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तयारी देखील पूर्ण केली असल्याचे त्यांनी जिल्हाध्यक्ष नुरूद्दीन सय्यद यांना सांगितले.
दरम्यान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची जर ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी असेल तर त्याबाबत कोणतीही हरकत नाही. आपण या निवडणुका स्वबळावर लढू असा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांच्यासह देवरुख तालुका अध्यक्ष काशीराम वाजे, पदाधिकारी अशोक पवार ,अशोक जाधव, लक्ष्मीकांत जाधव, रवींद्र गुरव, विश्वनाथ किल्लेदार, अनिल धावणे आदींसह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

चौकट- देवरुख -संगमेश्वर तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जिल्हाध्यक्ष नुरूद्दीन सय्यद हे दिनांक २७ आणि २८ डिसेंबर रोजी देवरुख तालुक्याचा दौरा करणारा आहेत. या दौऱ्यात ते जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यानी सांगितले.