फोंडाघाट,घोणसरी, बोंडगवाडी, पिंपळवाडी परिसरात दहशत वाजवणारा बिबट्या अखेर जेरबंद !

वनविभाग अधिकारी व त्यांच्या टीमचे यशस्वी ऑपरेशन ! ग्रामस्थांचे सहकार्य !

फोंडाघाट /कुमार नाडकर्णी– फोंडाघाट पासून चार-सहा किलोमीटरवर घोणसरी गावातील बोंडकवाडी– पिंपळवाडी रस्त्यावर, परिसरात बिबट्या चे वास्तव्य असल्याने, तेथे चार-पाच दिवस स्थानिक ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण होते. विशेषतः शाळा सुटल्यावर होणाऱ्या दर्शनामुळे परतणाऱ्या मुला- मुलींमध्ये आणि पालक वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले. बिबट्याच्या बंदोबस्ताच्या मागणीची दखल घेत, फोंडाघाट चे वनविभाग अधिकारी कोळेकर, सारीक यांच्या टीमने तसेच घोणसरी सरपंच प्रसाद राणे ,पोलीस पाटील भालचंद्र राणे, समीर राणे ,मिहीर मराठे, दीपक राणे, हेमंत कोंडेकर यांनी तातडीने या परिसराची पाहणी करून, बिबट्याच्या पायरोवाचा मागोवा घेत, पिंजरा लावला. आणि रात्री भक्षाच्या शोधात फिरणारा बिबट्या अलगद पिंजऱ्यात जेरबंद झाला. वन अधिकारी व टीमच्या अभ्यासपूर्ण मागोव्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व कौतुक व्यक्त होत आहे. त्यांनी सुरक्षेचा विश्वास टाकला. अर्थात बोंडकवाडी, पिंपळवाडी लगत सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत. त्यामुळे नेहमी येथिल नागरिकांना जंगली श्वापदांचा सामना करावा लागतो. याचीही वन विभागाने नोंद घेणे आवश्यक आहे…