खेड (प्रतिनिधी) – खेड (उत्तर) तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटी, रणनीती आणि तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या मेळाव्याला भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्ह्याचे विशेष निमंत्रित व ज्येष्ठ नेते राजूभाई रेड्डीज, खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश बामणे, मंडळ अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उपाध्यक्ष मनोज गायकवाड, वैजेश सागवेकर, विनोदकुमार मोरे व दिव्या होळकर, सरचिटणीस शुभम गायकवाड, युवा मोर्चा अध्यक्ष विशाल होळकर, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. संजीवनी शेलार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन करताना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा प्रभावीपणे प्रचार करून त्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला भक्कम यश मिळवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ पातळीवर सक्रिय राहावे, संघटन मजबूत करावे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करावे, असे आवाहन करण्यात आले.
या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि निवडणुकीतील तयारीबाबत आपली मते मांडली. पक्ष संघटन अधिक गतिमान करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप खेड (उत्तर) सज्ज असल्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.













