खेड (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळविण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी जिल्हा परिषद सदस्य अरुण गंगाराम कदम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. जिल्हा परिषद रत्नागिरीच्या ग्रामपंचायत विभागाने आता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना जन्म-मृत्यू दाखले थेट ग्रामपंचायत स्तरावरूनच देण्याचे निर्देश जारी केले आहेत.
जिल्हा परिषद रत्नागिरीकडून २२ जून २०२६ रोजी काढण्यात आलेल्या आदेशात जिल्हा परिषद सदस्य अरुण गंगाराम कदम यांनी उपस्थित केलेल्या विषयाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. जिल्हा सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा मांडला होता. ग्रामीण भागातील नागरिकांना जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी पंचायत समिती कार्यालयात जावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत असल्याची बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी नियम २००० नुसार ग्रामपंचायत अधिकारी हे जन्म-मृत्यू नोंदणीचे निबंधक आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना आवश्यक असलेले दाखले ग्रामपंचायत स्तरावरूनच मिळणे अपेक्षित आहे. तथापि, जुन्या नोंदी पंचायत समितीकडे जतन करण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना दाखल्यासाठी पंचायत समितीकडे पाठविले जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट निर्देश देत ऑनलाइन उपलब्ध असलेल्या नोंदींच्या आधारे ग्रामपंचायत स्तरावरूनच जन्म व मृत्यू दाखले देण्याची जबाबदारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. नागरिकांना कोणत्याही कारणास्तव पंचायत समिती कार्यालयात पाठवू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सदस्य अरुण गंगाराम कदम यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाची दखल घेत प्रशासनाने निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील हजारो ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता कमी होणार असून, ग्रामपंचायत स्तरावरच ही सेवा उपलब्ध होणार असल्याने वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होणार आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि लोकाभिमुख सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा परिषद प्रशासनाच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.











