कंत्राटदार, राजकीय कार्यकर्ते, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची डॉ. नातू यांची मागणी
गुहागर/ प्रतिनिधी – व्याडेश्वर देवस्थान गुहागर व महसूल विभागाच्या मालकीच्या तळ्यामध्ये अनधिकृतपणे भराव टाकणाऱ्या कंत्राटदार, राजकीय कार्यकर्ते व संबंधित अधिकारी यांच्यावर भारतीय दंड संहिता व महसूल कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी
जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, राष्ट्रीय महामार्ग उप विभागीय अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गुहागर शहरामध्ये अतिक्रमित दुकानांचे, गाळ्यांचे भूसंपादना नंतर पाडण्याचे काम विविध विभागामार्फत झाले. या बांधकामाचा असणारा सर्व राडारोडा व खराब बांधकाम वस्तूंची विल्हेवाट योग्य ठिकाणी शासनाच्या परवानगीने करणे गरजेचे होते. परंतु, असे न करता गुहागर शहराच्या दर्शनी भागात व जगभरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या व्याडेश्वर देवस्थानाजवळील तळ्याचे सर्व भूसंपादन झालेले नसताना या तळ्यामध्ये हा सर्व खराब राडारोडा व खराब कचरा टाकण्यात आला.
हे नियमबाह्य काम करण्याकरिता संबंधित असणारे काही राजकीय पदाधिकारी, कंत्राटदार व त्यांना सहकार्य करणारे अधिकार या सर्वांवर भारतीय दंड संहिता कायदा व महसूल नियम व संहिता कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी डॉ. नातू यांनी केली आहे.













