आरोपी शुभम रावराणेवर गुन्हा दाखल
वैभववाडी प्रतिनिधी
कोणतेही कारण नसताना मोबाईल शॉपीतून बाहेर काढत शुभम रावराणे याने व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत व्यापारी योगेश बाबुराव कदम वय 29 रा. करूळ भट्टीवाडी हा गंभीर जखमी झाला आहे. वैभववाडी पोलिसांनी आरोपी शुभम रावराणे वय 30 रा. बाजारपेठ वैभववाडी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच करूळ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. आरोपी शुभम रावराणे याच्यावर फसवणुकीचे व इतर अनेक तक्रारी आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
व्यापारी योगेश बाबुराव कदम यांचे वैभववाडी बाजारपेठ दत्तमंदीर जवळ मोबाईल शॉपी आहे. एका छोट्याशा टपरीतून तो हा व्यवसाय करत आहे. बुधवारी सकाळी 10 वा. स्थानिक ग्राहकाबरोबर मोबाईल दुरुस्तीवरून कदम यांच्यात बाचाबाची झाली होती. उपस्थित नागरिकांनी त्यांचा विषय मिटवला ही होता. दुपारनंतर आरोपी शुभम रावराणे हा योगेश च्या दुकानाजवळ दाखल झाला. त्याने योगेशला टपरीतून बाहेर काढत मारहाण केली. त्याचा शर्ट फाडला व शिवीगाळ करत त्याला दांड्याने पाठीवर व छातीवर मारून दुखापत केली आहे. उपस्थित रणजीत तावडे, विशाल साळुंखे यांनी योगेशला बाजूला केला. या मारहानीची बातमी करूळ गावात समजताच ग्रामस्थ पोलीस ठाण्यात धडकले. संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही पोलिस ठाण्यातून घालणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. पोलिसांनी आरोपी शुभम रावराणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहे.











