पुणे । प्रतिनिधी :
दापोली येथील वराडकर बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत दगडोबा कऱ्हाड यांच्या “AI Based Online Digital Education Device” या अभिनव संकल्पनेला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत डिझाइन पेटंट प्रदान करण्यात आले आहे. या यशामुळे शिक्षण क्षेत्रात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
हे पेटंट डिझाइन क्रमांक 469342-001 अंतर्गत नोंदणीकृत असून, डिझाइन कायदा 2000 नुसार पुढील दहा वर्षांसाठी त्याचे बौद्धिक संपदा अधिकार सुरक्षित झाले आहेत. हे उपकरण प्रामुख्याने अध्ययन, अध्यापन आणि मूल्यांकन प्रणाली अधिक आधुनिक करण्यासाठी विकसित करण्यात आले असून, याद्वारे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे सुलभ होणार आहे.
डॉ. भारत कऱ्हाड हे Ph.D, M.Com, MBA, CA अशा उच्च पदव्या प्राप्त शिक्षणतज्ज्ञ असून गेल्या तीस वर्षांपासून शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी १८ पेक्षा अधिक ग्रंथ आणि २३ संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. २००३ साली त्यांना पुणे विद्यापीठाकडून ‘बेस्ट NSS ऑफिसर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अॅड. विनायक विठ्ठल आंबेकर यांनी डॉ. कऱ्हाड यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या प्रकल्पात डॉ. कऱ्हाड यांना प्रा. रीना सिंग, प्रा. बी. के. सरकार, प्रा. वंदना सिंग आणि मिस परी निधी सिंग यांचे सहकार्य लाभले. भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.











