नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी माहितीपर व मनोरंजनात्मक उपक्रमांची रेलचेल
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त २ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह साजरा होणार असून यात नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी माहितीपर व मनोरंजनात्मक उपक्रमांची रेलचेल असणार आहे.
सप्ताहाची सुरुवात २ जानेवारी रोजी आरपीडी स्कूलमध्ये निबंध स्पर्धेने आणि मळगाव हायस्कूलमध्ये पोलीस कामकाज व शस्त्र प्रदर्शनाने होईल. ३ जानेवारी रोजी जगन्नाथराव भोसले उद्यान येथे सकाळी ९ ते २ या वेळेत सायबर क्राईम, बॉम्ब शोध पथक, भरोसा सेल आणि वाहतूक विभागाचे विशेष स्टॉल्स लावून जनतेला माहिती दिली जाणार आहे.
४ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यासमोर पोलीस, पत्रकार आणि शासकीय कर्मचारी यांच्यात व्हॉलीबॉल स्पर्धा रंगतील. ५ जानेवारीला सकाळी ६:३० वाजता मोती तलाव परिसरात ‘मॉर्निंग वॉक’ उपक्रम राबवण्यात येईल. ६ जानेवारी रोजी पोलीस ठाणे आवारात ज्येष्ठ नागरिक मेळावा आणि महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
७ जानेवारी रोजी रोटरी क्लबच्या सहकार्याने पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सावंतवाडी पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आले आहे.









