ऑटोमोबाईल रेडिएटरमधील संशोधनाबद्दल विशेष गौरव
सावंतवाडी । प्रतिनिधी :यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा मेकॅनिकल विभागाचे अधिव्याख्याता सचिन सुनील लांजेकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘हीट ट्रान्सफर’ विषयात नुकतीच पीएचडी (डॉक्टरेट) पदवी संपादन केली आहे. कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटीतून त्यांनी आपले हे उच्च संशोधन पूर्ण केले असून, त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. सचिन लांजेकर यांनी ‘ऑटोमोबाईल रेडिएटरमध्ये नॅनोपार्टिक्युलेट बायनरी फ्लुइडच्या सहाय्याने उष्णता हस्तांतरण वाढविणे’ (Enhancement of heat transfer using nanoparticulate binary fluid in automobile radiator) या विषायवर आपले संशोधन पूर्ण केले आहे. २०१९ मध्ये संशोधनासाठी नोंदणी केल्यानंतर सलग सहा वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर त्यांनी ही मानाची पदवी प्राप्त केली.
वाहनांची कार्यक्षमता वाढण्यास होणार मदत
डॉ. लांजेकर यांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण संशोधनाचा थेट उपयोग वाहनांच्या रेडिएटरची कार्यक्षमता वाढविण्यासाठी होणार आहे. यामुळे इंजिनचे तापमान अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येणे शक्य होईल. परिणामी, वाहनांची इंधन कार्यक्षमता (एव्हरेज) वाढण्यासोबतच, इंजिनचे आयुष्य आणि वाहनांची एकूण कामगिरी सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.
संस्थेकडून विशेष सत्कार
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीतर्फे डॉ. सचिन लांजेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले. “शिक्षकांनी सातत्याने आपले उच्च शिक्षण पूर्ण करून ज्ञान अद्ययावत ठेवावे आणि विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श निर्माण करावा,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ. लांजेकर भावुक झाले होते. त्यांनी आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय आई-वडील, आपले मार्गदर्शक आणि सर्व सहकारी सहकाऱ्यांना दिले.
या गौरव सोहळ्याला संस्थेच्या अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंत भोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सीईओ ले. कर्नल रत्नेश सिन्हा (नि.), प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले यांच्यासह संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. लांजेकर यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रातून आणि भोसले इन्स्टिट्यूट परिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













