खेड (प्रतिनिधी) : खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचालित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर (माध्यमिक विभाग) व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिर (उच्च माध्यमिक विभाग) भडगाव येथे आयोजित वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडल्या. इयत्ता 6 वी ते 11 वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विविध क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखवले.
बौद्धिक विकासासोबतच शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळ आवश्यक असल्याचे प्रतिपादन करत स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक मा. स्वप्निल पांडुरंग सैतवडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा यांनी केले, तर प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम यांनी करून दिला. कार्यक्रमाला विश्वस्त भालचंद्र कांबळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे, तसेच पर्यवेक्षक आणि क्रीडा शिक्षक संतोष भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन इयत्ता ११ वीच्या विद्यार्थिनी प्रांजल गुरव, निधी सावंत, फातिमा जसनाईक, तेजस्वी कदम, राधा भागवत व स्वरा जोशी यांनी संयुक्तरीत्या केले. उद्घाटनप्रसंगी बोलताना स्वप्निल सैतवडेकर यांनी स्वतःचा खेळातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत खेळामुळे वेळेचे बंधन, शिस्त, धैर्य आणि सहकार्य वृत्तीची जोपासना कशी होते याचे उत्तम मार्गदर्शन केले. चांगल्या खेळाचा उपयोग आयुष्याच्या पुढील वाटचालीत कसा होतो आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणून समाजात आपली ओळख कायम राहते याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर संदेश दिला.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना चार गटात — ज्ञानदीप सुपरकिंग्ज, ज्ञानदीप इंडियन्स, ज्ञानदीप नाईट रायडर्स आणि ज्ञानदीप कॅपिटल — असे विभागण्यात आले होते. प्रत्येक गटाला स्वतंत्र रंगांच्या जर्सी देण्यात आल्या होत्या. व्हॉलीबॉल, फुटबॉल, मिनी फुटबॉल, नेटबॉल, थ्रोबॉल, बॅडमिंटन, हार्डल्स, बॉक्स क्रिकेट, लंगडी, दोरी उड्या, बुद्धिबळ, गोळाफेक अशा विविध खेळांमध्ये प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. क्रीडा स्पर्धेदरम्यान संपूर्ण विद्यासंकुलात उत्साह, टाळ्यांचा कडकडाट आणि स्पर्धेची रोमांचकता अनुभवायला मिळाली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात क्रीडा प्रमुख संतोष भोसले, मारुती आडाव, रवींद्र ओकटे, शांतीलाल आव्हाड, सुनील यादव, महादेव वाघमोडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.
विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे व खेळाडू वृत्तीचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे तसेच सल्लागार मंडळातील मान्यवर व ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
या वार्षिक क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि मैत्रीची भावना अधिक दृढ झाली असून पुढील वर्षी अधिक उत्साहाने क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.











