संगमेश्वर : संगमेश्वर येथील सप्तेश्वर रोडवरील संगमेश्वर हिल येथे असलेल्या आयडीया कंपनीच्या मोबाईल टॉवरवर चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ही घटना ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी ६ जानेवारी २०२६ रोजी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संदीप रामचंद्र पवार (वय ४०, रा. नावडी) हे सदर टॉवरवर केअर टेकर म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी संशयित आरोपी फुरकान अब्दुल हक (वय २५, रा. विजयपूर, ता. कैसरगंज, जि. बहरइच, उत्तर प्रदेश) हा आपल्या दोन साथीदारांसह आयडीया व्होडाफोन कंपनीचे २जी बीटीएस साहित्य आणि केबल चोरत असताना फिर्यादींच्या निदर्शनास आला. फिर्यादीने त्यांना रंगेहात पकडून चौकशी केली असता, सय्यद हसम आणि अन्य एक ३० वर्षीय पुरुष असे त्याचे दोन साथीदार तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, फरार संशयित आरोपींचा शोध आणि पुढील तपास पोलीस करत आहेत.













