एडगांव नं. 1 प्रशालेतील शुभ्रा सावंत हीचे सर्वत्र होतेय कौतुक
वैभववाडी l प्रतिनिधी : एडगांव नं.1 शाळेतील शुभ्रा सावंत या पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीने चांद्रयान 3 ची हुबेहूब प्रतिकृती बनविली आहे. तिने बनवलेल्या प्रतिकृतीचे सर्वत्र कौतुक होत असून तिचे अभिनंदन केलेे जात आहे.
चांद्रयान 3 च्या उड्डाणबाबतची माहिती व त्याचा प्रात्यक्षिक व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेत दाखविण्यात आला. त्याच दिवशी शाळा श्री रामेश्वर विद्यामंदिर एडगाव नं 1 येथे दाखवण्यात आला होता व त्याचवेळी सर्व विद्यार्थ्यांना चांद्रयान 3 मोहिमेबद्दल माहितीपर मार्गदर्शन व त्यासंबंधीच्या त्यांच्या विविध कुतूहापोटी निर्माण झालेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन वर्गशिक्षिका सारिका सासणे व मुख्याध्यापक चेतन बोडेकर यांनी केले होते. याच्याच पार्श्वभूमीवर शुभ्रा सावंत या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनीने अतिवृष्टीसाठी दिलेल्या दोन दिवसांच्या सुट्टीच्या कालावधीत आपले पालक पूजा सावंत, प्रभाकर सावंत यांच्या मदतीने चांद्रयान 3 ची प्रतिकृती बनवली आहे. या प्रति कृतीवर बारकाईने निरीक्षण करून नोंदविलेल्या इसरो, भारत, SLV 3 यांसारखा नावांचा उल्लेख तीने आवर्जून केला आहे. बनविलेली ती प्रतिकृती हुबेहूब असलेचे दिसून येते आहे.
या प्रतिकृतीचे कौतुक करताना केंद्रप्रमुख श्री रामचंद्र जाधव यांनी अशा प्रकारच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून उद्याचे वैज्ञानिक तयार होण्यास लहान वयापासूनच चालना मिळेल व विद्यार्थ्यांना देखील नवनवीन गोष्टींचे ज्ञान प्राप्त होऊन त्यांच्या अभ्यासाचा व प्रगतीचा मार्ग सुकर होईल असे मत व्यक्त केले.
या प्रतिकृती बद्दल शुभ्रा सावंत या विद्यार्थिनीचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रताप रावराणे, केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव, विस्तार अधिकारी अशोक वडर, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे व सर्व पालक वर्गातून कौतुक होत आहे.











