सोनुर्ली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : ७५ रुग्णांची तपासणी

सामाजिक बांधिलकीतून सोनुर्ली सोसायटी व ‘नॅब’ रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम

सावंतवाडी | प्रतिनिधी :सोनुर्ली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आणि नॅब नेत्र रुग्णालय (सावंतवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने सोनुर्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा व तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या उपक्रमात एकूण ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, या उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.

दिमाखदार उद्घाटन

हे शिबिर सोनुर्ली येथील सोसायटीच्या इमारतीमध्ये पार पडले. शिबिराचे उद्घाटन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप गावकर आणि ‘नॅब’ संस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सोनुर्लीचे सरपंच नारायण हिराप, उपसरपंच भरत गांवकर, सोसायटीच्या उपाध्यक्ष आरती गांवकर, स्नेह नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका संगीता प्रभू आणि नॅबचे संचालक भालचंद्र कशाळीकर उपस्थित होते.

‘नॅब’चे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर जिल्ह्याची शान

यावेळी मार्गदर्शन करताना नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर म्हणाले की, “नॅब संस्था संपूर्ण जिल्ह्यात अंध बांधवांसाठी समर्पित भावनेने कार्यरत आहे. सावंतवाडी (भटवाडी) येथे संस्थेचे सुसज्ज रुग्णालय असून, तेथील ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’ ही जिल्ह्याची शान आहे. केवळ सामाजिक हेतूने गरजू रुग्णांना दृष्टी मिळावी, यासाठी आम्ही अत्यंत माफक दरात शस्त्रक्रिया करतो. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

शिबिरात गावातील ७५ नागरिकांनी आपली नेत्रतपासणी करून घेतली. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर गरजू रुग्णांना मोतीबिंदू व इतर पुढील उपचारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

याप्रसंगी संचालक अविनाश गाड, अनंत परब, सिताराम गावकर, दिगंबर गांवकर, अजित महाडीक, निलेश गांवकर, जिवाजी गांवकर, मंदाकिनी गांवकर, अविनाश जाधव, नामदेव आरोंदेकर, विनोद ठाकूर आणि लिपिक सान्वी गावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सहसचिव अर्जुन गांवकर यांनी केले. ग्रामीण भागातील जनतेसाठी राबवलेल्या या आरोग्यदायी उपक्रमाबद्दल सोनुर्ली ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.