खेड फोटोग्राफी असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील छायाचित्रकारांना संघटित करण्याच्या आणि फोटोग्राफी व्यवसायाला एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘खेड फोटोग्राफी असोसिएशन’ची नव्याने स्थापना करण्यात आली असून, या असोसिएशनचा पदग्रहण सोहळा खेड शहरात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात तालुक्यातील सर्वच भागांतून छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या असोसिएशनच्या स्थापनेसाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी माजी अध्यक्ष हर्षदीप उर्फ बाळा सासणे यांनी केलेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच नव्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पदग्रहण सोहळ्यात नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी रोहन राठोड (बालाजी फोटोग्राफी) यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष म्हणून यश साळवी, सचिव म्हणून आदर्श पाटील तर खजिनदारपदी सुजित गांगण यांची निवड जाहीर करण्यात आली. सहसचिव म्हणून सिद्धेश मोरे आणि सहखजिनदार म्हणून आयुष खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशनच्या सोशल मीडिया व्यवस्थापनाची जबाबदारी मृणाल मडव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
याशिवाय कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय शिगवण, मिलिंद कांनसावडे, मोहम्मद अली जासनाईक, राजेंद्र जाधव, प्रकाश जाधव आणि शुभम भुवड यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या वतीने माजी अध्यक्ष हर्षदीप उर्फ बाळा सासणे यांना खेड फोटोग्राफी असोसिएशनचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले असून, पुढील कार्यकाळात त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ संघटनेला मिळणार आहे.
या सोहळ्यातील भाषणातून उपस्थित छायाचित्रकारांनी नव्या संघटनेमुळे फोटोग्राफी क्षेत्रात एकोपा वाढेल, व्यवसायिक अडचणी सोडवण्यासाठी एक मजबूत प्लॅटफॉर्म तयार होईल आणि आगामी काळात छायाचित्रकारांना विकासाची नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. खेड व परिसरातील फोटोग्राफी व्यवसायाला नवचैतन्य देणारी ही संघटना आगामी काळात विविध उपक्रम राबवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.