खेड (प्रतिनिधी) – ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य मोरवंडे–बोरज येथील हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेला ‘सड्डा पिंड’ पंजाबी थीम डिनर उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. पंजाबच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन खेड-भरणे येथील उद्योजक हणमंत गुंडाप्पा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी केले.
पंजाबच्या परंपरागत वातावरणाची मोहक सजावट, रंगीबेरंगी लाईटिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण महाविद्यालय परिसर गजबजून गेला होता. पंजाबी नृत्य, संगीत, पारंपरिक वेशभूषा आणि मनोरंजनात्मक उपक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले. अवघ्या ३०० रुपयांत उपलब्ध असलेल्या अनलिमिटेड पंजाबी डिनरची विशेष आकर्षण ठरले. शाकाहारी व मांसाहारी पदार्थ, पाणीपुरी, लस्सी, तसेच पारंपरिक विशेष पदार्थांचा आस्वाद घेत सर्वांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
या उपक्रमास विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थितांसाठी आयोजित करण्यात आलेला भव्य लकी ड्रॉही कार्यक्रमाचे अतिरिक्त आकर्षण ठरला. संपूर्ण आयोजन हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना विविध प्रांतांची संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि परंपरा यांची ओळख करून देणे, तसेच शैक्षणिक जीवनासोबत सांस्कृतिक समृद्धी साधणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्राधिकाऱ्यांनी सांगितले. ‘सड्डा पिंड’ उपक्रमाने ज्ञानदीप महाविद्यालयाच्या उत्स्फूर्त उपक्रमशीलतेला नवा आयाम दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. अकिल देशमुख, प्रा. विनय गुहागरकर, प्रा. साक्षी शिंदे आणि प्रा. ऋचा सोमण यांनी जबाबदारी पार पाडली. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अनमोल पडवेकर आणि पालक प्रतिनिधी म्हणून योगेश आपटे यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक प्रा. संजोग जाधव यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांनी करून दिली.
या प्रसंगी महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढढा, विश्वस्त भालचंद्र कांबळे, खजिनदार विनोद बेंडखळे, प्रफुल्ल महाजन, नगरसेविका वैभवी खेडेकर, नगरसेवक अरिफ मुल्ला, रेश्मा जाधव, बोरज–निगडे सरपंच विशाल घोसाळकर, सीतारामपंत जामकर यांसह विविध आस्थापनांचे प्रमुख, विद्यार्थी, शिक्षक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढढा आणि प्राचार्य डॉ. विजय अनंत कुलकर्णी यांनी कौतुक करून विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.












