राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले व उपाध्यक्ष विजय पाध्ये यांचा राजीनामा

राजापूर प्रतिनिधी  : राजापूर अर्बन बँकेवर सत्तेत असलेल्या सर्व पक्षिय सहकार पॅनेलने निश्चित केलेल्या धोरणानुसार आपली एक वर्षाची मुदत संपल्याने बँकेचे अध्यक्ष संजय ओगले व उपाध्यक्ष विजय पाध्ये यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांच्याकडे हे राजीनामे सुपुर्द करण्यात आले आहेत.
सोमवारी १९ जानेवारी रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत या राजीनाम्यांवर निर्णय घेतला जाणार असून पुढील वर्षासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षांची नावे निश्चित केले जाणार आहेत.
राजापूर अर्बन बँकेवर सर्वपक्षिय सहकार पॅनेलची पुर्ण बहुमताने सता आहे. सहकार पॅनेलने प्रारंभीपासूनच सर्व संचालकांना अध्यक्ष व उपाध्यक्षपदी संधी देता यावी यासाठी या दोन्ही पदांचा कार्यकाळ एक वर्षाचा केलेला आहे. पहिल्या वर्षी अध्यक्षपद संचालक हनिफ मुसा काझी यांनी तर दूसऱ्या वर्षी अनामिका जाधव यांनी अध्यक्षपद भूषविले होते. तिसऱ्या वर्षी संजय ओगले हे अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी विजय पाध्ये हे विराजमान झाले होते. त्यांचा कार्यकाळ एक वर्षचा होता, त्यांनी आपली एक वर्षाची मुदत संपल्याने या आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
आता पुढील एका वर्षासाठी अध्यक्षपदासाठी एड. शशिकांत सुतार यांच्या नावाची चर्चा आहे. तर उपाध्यक्षपदासाठीही नाव निश्चित केले जाणार आहे.
सोमवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत या राजीनाम्यांच्या मंजूरीबाबत निर्णय होऊन ते सहकार विभागाकडे पाठविले जाणार आहेत. त्यानंतर नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे.