डेरवण एनर्जीया फुटबॉल स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन

चिपळूण,  : डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात १७ वर्ष वयोगटातील मुलींसाठी डेरवण एनर्जीया फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये हरियाणा, कर्नाटक, गोवा या राज्यांमधून तसेच मुंबई, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी अशा जिल्ह्यांमधून एकूण १२ संघ सहभागी झाले आहेत.

या स्पर्धेचे उदघाटन निवृत्त डेप्युटी सेक्रेटरी (मंत्रालय) उमेश मदन यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते नाणेफेक करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी क्रीडा संघटक श्रीपाद पाटील, व एसव्हीजेसीटी क्रीडा संयोजन समितीचे सदस्य प्रशांत सावंत, निलेश शेडगे, दिनेश पुजारी, विजय जाधव, ज्ञानेश जाधव, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर व आदि मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत पहिल्या दिवसात खेळविण्यात आलेल्या प्रथम सामन्यामध्ये संजीवन एस. ए (ब) विरुद्ध रत्नागिरी यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात ६ – ० अशा गुणांची कमाई करून संजीवन एस. ए (ब) या संघाने विजय मिळविला. तसेच दुसऱ्या सामन्यात एस ३ सॉकर अकॅडेमी विरुद्ध फलटण जिमखाना यांच्यामध्ये ५ – ० अशा गुणांची कमाई करत एस ३ सॉकर अकॅडेमी संघाने विजय मिळविला.
भारतातील सर्वच राज्यांमध्ये फुटबॉल लोकप्रिय झाला आहे. ह्या मैदानी खेळामध्ये मुलींचे प्रमाण वाढलेले आहे, विविध राज्यांमधून अनेक संघ स्पर्धात्मक खेळासाठी अनेक ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपले कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात.

महाराष्ट्राबाहेरील संघ जेव्हा विशेषकरून महाराष्ट्रात नैसर्गिकरित्या समृद्ध कोकण प्रांतात येतात तेव्हा त्याचा नैसर्गिक खेळ आणखीनच बहरून येतो. भारतामधील युवा मुलींच्या मध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण होऊन त्यांचा सर्वांगीण शारीरिक विकास व्हावा यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते. सर्व सामने हे साखळी पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक तसेच वैशिष्ठ्यपूर्ण कौशल्य दाखविणाऱ्या खेळाडूंना आकर्षक चषक देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी कोल्हापूर येथील मॅच कमिशनर राजेंद्र राऊत, मुकुल सोमण यांनी स्वीकारली आहे.

 

चौकट : चांगले मैदान, चांगली खाण्यापिण्याची व्यवस्था आणि शिस्तप्रिय वातावरण या फुटबॉल खेळासाठी विशेषतः महिलांसाठी आणि अल्पवयीन मुलींसाठी अत्यंत कमी स्पर्धा होतात. त्यामध्ये रोख पारितोषिके आणि चषक यांचे प्रमाण अत्यल्प असते. म्हणून् त्यांना प्रोत्साहित करून खेळाची जास्तीत जास्त संधी मिळावी हा एकमेव उद्देश ठेऊन एसव्हीजेसीटी ट्रस्ट सदैव खेळाच्या स्पर्धा भरवत असते. अशी प्रतिक्रिया संस्थेचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी दिली.