राजापूर (वार्ताहर): शहरातील दिवटेवाडी येथील रहिवासी, सेवानिवृत्त शिक्षक आणि प. पू. गजानन महाराज (शेंगाव) यांचे निस्सीम भक्त श्रीकृष्ण धोंडू उर्फ आबा गोंडाळ (८८) यांचे शनिवार 17 जानेवारी रोजी वृध्दापकालाने निधन झाले.
गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची वृध्दापकालामुळे प्रकृती बरी नव्हती. त्यांचेवर उपचार देखील सुरू होते. अखेर शनिवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचेवर शहरातील दिवटेवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ईश्वरचरणी अर्पण केले होते. शेगावच्या प. पू. गजानन महाराजांवरील त्यांची अपार श्रद्धा सर्वपरिचित होती. दिवटेवाडी येथे त्यांनी श्री देव रवळनाथ सिद्धेश्वर गजानन मंदिराची स्थापना केली. या सुंदरबन मठात गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी प. पू. गजानन महाराजांची निष्ठेने उपासना, सेवा व भक्तीमार्गाचा प्रचार केला.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मठात प. पू. गजानन महाराज प्रकटदिन, गुरुपौर्णिमा व दीपोत्सव हे धार्मिक उत्सव भक्तिभावाने साजरे केले जात. समाजात भक्तीभाव, सदाचार व अध्यात्मिक उन्नती वाढावी यासाठी त्यांनी सतत प्रबोधन केले.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे,जावई असा मोठा परिवार आहे.











